टी20 वर्ल्डकप जिंकताच हार्दिक पांड्याला मिळाली आनंदाची बातमी, झालं असं की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी हार्दिक पांड्याच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली होती. कौटुंबिक असो की करिअरच्या बाबतीत हार्दिक पांड्याची स्थिती नाजूक होती. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपासून पुन्हा एकदा हार्दिक पांड्या ट्रॅकवर आला आहे. आयसीसीकडून हार्दिक पांड्याला खूशखबर मिळाली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ट्रोलर्स देखील हार्दिक पांड्याचं कौतुक करताना दिसत आहे. कारण टी20 वर्ल्डकप जेतेपदात त्याचा मोलाचा वाटा आहे. अंतिम सामन्यात त्याने टाकलेला चार षटकांचा स्पेल खूपच महत्त्वाचा होता. तर फलंदाजीतही हार्दिक पांड्याने कमाल दाखवली. त्याची ही अष्टपैलू कामगिरी पाहून आयसीसीकडून त्याला सन्मान मिळाला आहे. हार्दिक पांड्या हा जगातील नंबर 1 अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत हार्दिक पांड्या टॉपला पोहोचला आहे. हार्दिक पांड्याने मोहम्मद नबी आणि वानिंदु हसारंगा यांना पाठी टाकत हा क्रमांक पटकावला आहे. पांड्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. हार्दिक पांड्याने आठ सामन्यात 48 च्या सरासरीने 144 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 150हून अधिकचा होता. या खेळीत त्याने एक अर्धशतकही ठोकलं आहे. तसेच गोलंदाजीत 8 सामन्यात 11 गडी बाद केले आहे. इतकंच काय तर अंतिम सामन्यातील 3 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केले. त्यात त्याने हेन्रिक क्लासेन आणि डेविड मिलर यांना बाद करत टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर आणलं.
आयपीएल 2024 स्पर्धेत पांड्याची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली होती. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळे त्याचं संघात निवड होईल की नाही इथून सुरुवात होती. इतकंच काय तर त्याला प्रत्येक सामन्यात ट्रोल केलं जात होतं. पण हार्दिक पांड्याने आपल्या कामगिरीने या सर्वांची तोंडं बंद केली आहेत. इतकंच काय तर ट्रोलर्सही त्याची स्तुती करताना दिसत आहे. आता टी20 वर्ल्डकपनंतर हार्दिक पांड्याकडे टी20 संघाची धुरा सोपवली जाऊ शकते. कारण हार्दिक पांड्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपकर्णधार होता. तसेच अनेकदा त्याने कर्णधारपदाची भूमिका बजावली आहे.
टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची ही फक्त सुरुवात असल्याचं त्याने सांगितलं होतं. तसेच अजून पाच ट्रॉफी जिंकायच्या आहेत असं सांगितलं होतं. हार्दिक पांड्या जर कर्णधार झाला तर त्याच्या नेतृत्वात 2026 चा वर्ल्डकप खेळला जाईल. हा वर्ल्डकप भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या आयोजित करण्यात आला आहे.