Video : भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात पावसाचा लपंडाव, पंचांचा अंदाज दोन वेळा चुकल्यानंतर हार्दिक पांड्याने केलं असं काही…
IND vs NEP, Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत भारताला नेपाळचा पेपर कठीण गेला असंच म्हणावं लागेल. लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने 200 च्या पार धावसंख्या केली. या सामन्यात पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे पंचांची तारांबळ उडाली होती.
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 150 च्या आता नेपाळ संघाला गुंडाळेल असं वाटत असताना क्रिकेट पंडितांचे सर्व अंदाज फोल ठरले. नेपाळने सर्वबाद 230 धावा केल्या आणि विजयासाठी 231 धावा दिल्या आहेत. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेपाळ संघाला जबरदस्त फायदा झाला. त्यामुळे वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची तयारी कितपत आली याचा अंदाज आता बांधला जात आहे. दरम्यान पहिला डाव सुरु असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांची तारांबळ उडाली. पण पावसाने पंचांची फिरकी घेतल्याचं दिसून आलं. यामुळे हार्दिक पांड्याला हसू आवरलं नाही. त्यानंतर त्याने केलेली कृती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय झालं मैदानात?
पहिल्या डावात 30 वं षटकं मोहम्मद सिराज टाकत असताना हलका पाऊस सुरु झाला. त्यामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि ग्राउंडमन्सना कव्हर करण्यासाठी बोलवण्यात आलं. पण ते खेळपट्टीपर्यंत पोहोचण्यापूर्वीत पावसाने दडी मारली. त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सामना पुन्हा सुरु झाला. 35 वं षटक रवींद्र जडेजा टाकत असताना पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. तेव्हा पंचांनी कव्हर करण्यासाठी बोलवलं आणि पाऊस गेला. तेव्हा मैदानात उपस्थित असलेल्या हार्दिक पांड्याला हसू अनावर झालं आहे. त्याने पंचांना मिठी मारली आणि चिडवलं.
— Nihari Korma (@NihariVsKorma) September 4, 2023
नेपाळचा डाव
टीम इंडियाने नाणेफेकीचा कौल जिंकत नेपाळला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. पहिल्या गड्यासाठी भुर्तेल आणि शेख यांनी 65 धावांची भागीदारी केली. आसिफ शेख याने भारताविरुद्ध पहिलं अर्धशतक झळकावलं. 97 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. तर तळाशी आलेल्या सोमपाल कामी यानेही चांगली फलंदाजी केली. 56 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुरने एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी