Video : हार्दिक पांड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर केलं मन मोकळं, हूटिंगबाबत सांगतिलं सर्वकाही
टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवल्यानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियाचं कौतुक होत आहे. सामन्य नागरिक ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच टीम इंडियाच्या यशाचं कौतुक केलं आहे. टीम इंडिया मायदेशी परतल्यानंतर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी खेळाडूंनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. खासकरून हार्दिक पांड्याने आपलं दु:ख यावेळी मांडलं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने टाकलेलं अंतिम षटक आणि सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल कोणीच विसरू शकत नाही. टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवून सहा दिवस उलटले आहेत तरी कौतुक सोहळा काही संपता संपत नाही. त्यामुळे भारतात क्रिकेटची किती क्रेझ आहे अधोरेखित होतं. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपचं जेतेपद मिळवावं अशी संपूर्ण देशाची इच्छा होती. अखेर टीम इंडियाच्या खेळाडूंनी बारबाडोसमध्ये ती पूर्ण करून दाखवली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी चषकांचा 11 वर्षांचा दुष्काळ दूर केला. तसेच 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप मायदेशी आणला. टीम इंडिया विजयानंतर काही दिवस वेस्ट इंडिजमध्येच अडकली होती. चक्रीवादळाची स्थिती असल्याने उड्डाणं रद्द करण्यात आली होती. अखेर पाच दिवसानंतर टीम इंडिया 4 जुलैला मायदेशी परतली. त्यांनी दिल्लीत पाय ठेवताच सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत दीड तास चर्चा केली. यावेळी हार्दिक पांड्याने आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या.त्याने आपलं सर्वच दु:ख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेदरम्यान हार्दिक पांड्याला आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितल्या. हार्दिक पांड्याचं मन यावेळी भरून आलं होतं. सर्वप्रथम त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर आपल्या भावना निसंकोचपणे मांडण्यास सुरुवात केली. “मागचे सहा महिने माझ्यासाठी खूपच विचित्र होते. यात बराच चढउतार पाहायला मिळाला. मी मैदानात गेलो तेव्हा क्रीडारसिकांनी डिवचलं. खूप काही घटना घडल्या.पण मी कायम एक गोष्ट लक्षात ठेवली होती ती म्हणजे उत्तर द्यायचं तर आपल्या खेळाने..कधीच कोणतं वक्तव्य करणार नाही. तेव्हाही शब्द फुटत नव्हते आताही फुटत नाही. मी आयुष्यात कायम एक गोष्ट शिकलो ती म्हणजे युद्धात कायम लढत राहिलं पाहीजे. कधीच मैदान सोडायचं नाही. वाईट काळही इथेच पाहायला मिळतो आणि यशपण इथेच दिसतं.”
Our World T20 🏏 Champions enthralled everyone with their outstanding performances. Had a wonderful conversation with them. Do watch! https://t.co/1UPGbCmx6F
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
“मी विश्वास ठेवला की मेहनत करत राहायची. मला सर्वांचं सहकार्य लाभलं. मग तो कॅप्टन असो की टीम स्टाफ..सर्वांनीच मदत केली. यासाठी मेहनत घेतली आणि देवाच्या कृपाने सर्वकाही ठीक झालं.शेवटच्या षटकात ती संधी मिळाली.”, असं हार्दिक पांड्याने पंतप्रधानांसमोर सांगितलं. याचीच री ओढत पंतप्रधानांनी हार्दिकला विचारलं की शेवटच्या षटकात सूर्याला काय सांगितलं? तेव्हा हार्दिक म्हणाला, “सूर्याने कॅच पकडला तेव्हा आम्ही सर्वांनी पहिलंच सेलिब्रेट केलं. तेव्हा अचानक आठवण आली आणि सूर्याला विचारलं सर्व काही ठीक आहे ना. त्याच्याकडून पुन्हा निश्चित करून घेतलं. कारण आम्ही आधीच सेलीब्रेशन करून मोकळं झालो होतो. त्याने गेम चेजिंग कॅच पकडला. जिथे आम्ही टेन्शनमध्ये होतो तिथून आनंदात गेलो. “