भारत-बांग्लादेश यांच्यातील पहिला टी20 सामना रद्द होणार? ग्वाल्हेरमध्ये नेमकं काय घडतंय?
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला टी20 सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमध्ये होणार आहे. पण आता हा सामना होणार की नाही याबाबत साशंकता आहे. हा सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. पण जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश पाहता काहीतर घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी 6 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानात जवळपास 14 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे.पण या सामन्यापूर्वी हिंदू महासभेने ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे. हिंदू महासभेने बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच रविवारी होणारा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. हिंदू महासभेला इतर काही संघटनांची साथ मिळाली आहे. हिंदू महासभेने बुधवारी तीव्र आंदोलन केलं होतं त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात, विरोध प्रदर्शन आणि सोशल मीडियावर वादग्रस्त कटेंट प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की, जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी पोलीस अधीक्षकांच्या शिफारसीनुसार भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार हद्दीतील कोणत्याही व्यक्तीने सामन्यात व्यत्यय आणल्यास किंवा धार्मिक भावना भडकावल्यास कारवाई करण्यात येईल. रिपोर्टनुसार, सुरक्षेसाठी स्टेडियमबाहेर 1600 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेश लीग स्पर्धा या मैदानात पार पडली होती. तेव्हा या सामन्यात धावांचा वर्षाव झाला होता. त्यामुळे भारत बांग्लादेश सामन्यातही असंच पाहायला मिळू शकतं. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, ‘जूनमध्ये खेळलेल्या 12 सामन्यात चार वेळा 200 धावांचा आकडा गेला आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात अशीच खेळपट्टी असेल.’
ग्वाल्हेरच्या याच मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमधील पहिलं द्विशतक झळकावलं होतं. गेली अनेक वर्षे सईद अन्वरच्या नावे असलेला 196 धावांचा विक्रम मोडीत काढला होता. 2010 मध्ये भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा साना 153 धावांनी जिंकला होता. तेव्हापासून या मैदानात एकही सामना झाला नव्हता. गेल्या काही वर्षात इंदुरमध्ये सामने होत होते.