चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून दोन वर्ल्डकप विजेते संघ कसे गेले बाहेर? नेमकं काय झालं?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ पात्र ठरले आहे.पण दोन वर्ल्ड चॅम्पियन संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत. नेमकं असं का झालं? त्याच्या मागचं कारण काय ते समजून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आठ संघ निश्चित झाले आहेत. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. पाकिस्तानने स्पर्धेच्या आयोजनासाठी संपूर्ण तयारी केली आहे. पण पाकिस्तानातील दहशतवाद पाहता गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघ पाकिस्तानशी सामना खेळलेला नाही. तसेच पाकिस्तानातही गेलेला नाही. पण या आठ संघांमध्ये सहा वर्ल्डकप जिंकणारे दोन संघ नाहीत. त्यामुळे असं का झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे संघ दुसरे तिसरे कोणतेही नसून वेस्ट इंडिज आणि श्रीलंका आहेत. दोन्ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाहीत. जर भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी गेला नाही किंवा हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा झाली नाही तर श्रीलंकेला संधी मिळेल. पण सध्या पात्र नसलेल्या या दोन्ही संघांना आयसीसी नियमाचा फटका बसला आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या टॉप 8 मध्ये स्थान मिळवणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. श्रीलंका गुणतालिकेत नवव्या, तर वेस्ट इंडिज संघ 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत क्वॉलिफायच झाला नाही. श्रीलंकन संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आऊट झाला आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ मागच्या पर्वातही पात्र झाला नव्हता. पण या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदा खेळणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर होता. त्यामुळे अफगाणिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत स्थान मिळालं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा पहिला मान दक्षिण अफ्रिकेला मिळाला आहे. 1998 मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करत विजय मिळला होता. त्यानंतर न्यूझीलंडने 2000 साली, श्रीलंका-भारताने 2002 साली, वेस्ट इंडिजने 2004 साली, ऑस्ट्रेलियाने 2006-2009 साली, भारताने 2013 साली, पाकिस्तानने 2017 साली जेतेपदावर नाव कोरलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी क्वालिफाय केलं आहे. 19 फेब्रुवारीला या स्पर्धेला सुरुवात होईल. तसेच भारताच्या गटात पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला सामना होईल. हा सामना 20 फेब्रुवारीला होईल. तर भारत पाकिस्तान सामना 1 मार्चला होणार आहे.