वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत उलथापालथ, इंग्लंडला अंतिम फेरीसाठी काय करावं लागणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यत सुरु असताना गुणतालिकेत मोठी उलथापालथ होत आहे. इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत एक पाऊल अंतिम फेरीच्या दिशेने टाकलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार असले तरी इंग्लंडलाही तितकीच संधी आहे. त्यामुळे जय पराजयानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ सध्या अव्वल स्थानी आहे. भारताला अजून 8 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी काही करून 5 सामन्यात विजय मिळाला तरच अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. भारतीय संघ 11 पैकी 8 सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहून 74.24 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, तर श्रीलंका 55.56 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानी आहे. असं असताना इंग्लंडनेही अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. इंग्लंडने पाकिस्तानचा पहिल्या कसोटी एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 45.59 इतकी आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत इतर कोणत्याही संघांच्या तुलनेत इंग्लंडने आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळले आहेत. इंग्लंडने आतापर्यंत 17 सामने खेळले आहेत यात 9 सामन्यात विजय, 7 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. इंग्लंडने नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याची संधी लांबली. आता उर्वरित सर्व 5 कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे आणि नशिबाची साथ आवश्यक आहे.
इंग्लंडला अजून 5 सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेत इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. त्यामुळे अंतिम फेरीचं चित्र बिघडलं. त्यात स्लो ओव्हर रेटमुळे विजयी टक्केवारीतून 19 गुण कापले. त्यामुळे अंतिम फेरीत गाठण्यासाठी उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे लक्ष असेल. इंग्लंडचे शेवटचे पाच सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत पात्र होण्याची शक्यता फक्त 10 टक्के आहे.
दुसरीकडे, गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ रसातळाला गेला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीच्या सर्वच आशा संपुष्टात आल्या आहेत. आता चमत्कार घडला तरी पाकिस्तानच अंतिम फेरी गाठणं कठीण आहे. पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीत आतापर्यंत 8 सामने खेळला आहे. त्यात दोन सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारी ही 16.67 इतकी आहे.