आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची एलिमिनेटर सामन्यात कशी आहे कामगिरी? जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आहे. राखेतून पुन्हा एकदा जन्म घेत भरारी घेतली आहे. आता एलिमिनेटर फेरीत बंगळुरुचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा करो या मरोची लढाई आहे.
आयपीएल स्पर्धेत गेल्या 16 पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जेतेपदाची प्रतीक्षा कायम आहे. या पर्वाच्या सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जेतेपदासाठी हवा होती. वुमन्स प्रीमियर लीगनंतर मेन्स टीमही कमाल करेल अशी आशा बाळगून चाहते आहेत. मात्र या स्पर्धेची सुरुवात हवी तशी झाली नाही. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकत विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न केला. मात्र सलग सहा पराभवामुळे संघ प्लेऑफ गाठेल असं वाटलंही नव्हतं. पण नियतीच्या खेळात कोण कुठे असेल सांगता येत नाही. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचली असून एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे. आरसीबीने आयपीएल इतिहासात तीन वेळा अंतिम सामना खेळला आहे. तर 16 पर्वात 14 वेळा प्लेऑफ खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात फक्त तीनवेळ एलिमिनेटर सामना खेळला आहे.
आयपीएल 2020 मध्ये आरसीबीने पहिल्यांदा एलिमिनेटर फेरीत धडक मारली होती. चौथ्या स्थानावर असताना हैदराबादविरुद्ध खेळली होती. तेव्हा आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा एलिमिनेटर फेरीत स्थान मिळालं. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीच्या स्वप्नांवर पाणी टाकलं होतं. तिसऱ्यांदा 2022 मध्ये आरसीबीने एलिमिनेटर फेरीत प्रवेश केला होता. त्यावेळेस लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत दुसऱ्या क्वॉलिफायर राउंडमध्ये धडक मारली होती. पण तिथे राजस्थान रॉयल्सने पराभूत केलं होतं.
आयपीएल इतिहासात आरसीबीने तीनवेळा एलिमिनेटर फेरीत धडक मारली आहे. यावेळी त्यांना फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. मात्र यावेळी आरसीबी संघाचा फॉर्म पाहता इतिहास पुसला जाईल अशी शक्यता आहे. सलग सहा सामने जिंकून एलिमिनेटर फेरी गाठणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. इतकंच काय तर नेट रनरेटही तितकाच महत्त्वाचा होता. इतक्या सगळ्या दबावातून हा संघ वर आला आहे. त्यामुळे इतर संघांनी आरसीबीला कमी लेखनं चांगलंच महागात पडू शकतं. आरसीबीचा एलिमिनेटर फेरीतील सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध 22 मे रोजी आहे.