आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार 3 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती. पण राजकीय स्थिती आणि हिंसाचार पाहता वर्ल्डकप स्पर्धा युएईत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन शाहजाह आणि दुबईत होणार आहे. 3 ऑक्टोबरला पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात शारजाह मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने ऑनलाईन तिकीट विक्री सुरु केली आहे. त्याचबरोबर मोठी घोषणाही केली आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग मैदानात यावा यासाठी रणनिती आखली आहे. 18 वर्षाखालील क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये फ्री एंट्री दिली जाणार आहे. दुसरीकडे, आयसीसीने तिकीटाचे दरही कमी ठेवले आहेत. सर्वात कमी किमतीचं तिकीट हे 5 दिरहम म्हणजेच भारतीय चलनात त्याची किंमत 114 रुपये इतकी आहे. सर्वाधिक किमतीचं तिकीट 40 दिरहम म्हणजे भारतीय चलनानुसार, 910 रुपये इतकं आहे.
एकाच ठिकाणी दोन सामने खेळले जाणार असतील तर एकाच तिकीटावर दोन्ही सामन्यांचा आनंद क्रीडारसिकांना लुटता येणार आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन तिकीट विक्री सुरु झाली आहे. t20worldcup.platinumlist.net या वेबसाईटवर जाऊन तिकीट नोंदणी करता येणार आहे. इतकंच काय तर दुबईल ऑफलाईन तिकीटही घेता येणार आहे. यासाठी दुबई आणि शाहजाह मैदानावर तिकीट खिडकी असणार आहे.
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले असून दोन गट पाडले गेले आहेत. अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका हे संघ आहेत. तर ब गटात बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना असणार आहे.