‘मी देशातील सर्वोत्तम स्पिनरपैकी एक आहे आणि…’, बांगलादेश कसोटीपूर्वी साई किशोर काय बोलून गेला
युवा फिरकीपटू साई किशोर बांगलादेश कसोटीपूर्वी त्याच्या विधानामुळे चर्चेत आला आहे. त्याचं विधान ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नक्की साई किशोरने असं म्हंटलं आहे का? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. सध्या निवड समितीच्या नजरेत नसताना मोठं विधान केलं आहे.
27 वर्षीय साई किशोरने अद्याप टीम इंडियात येण्यासाठी हवी तशी कामगिरी केलेली नाही. पण त्याच्या विधानाने भल्याभल्यांचा भुवया उंचावल्या आहेत. साई किशोर आयपीएलमध्ये 10 आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर टीम इंडियाकडून 3 टी20 सामने खेळला आहे. असं असताना साई किशोनरने स्वत:च्या गोलंदाजीबाबत मोठं विधान केलं आहे. कसोटी संघात संधी मिळायला हवी असं त्याने स्वत:च सांगितलं आहे. इतकंच काय तर भारतातल्या सर्वोत्तम फिरकीपटूपैकी एक असल्याचं जाहीर केलं. याच कारणामुळे भारताकडून कसोटी खेळण्याची संधी मिळायला हवी असं सांगितलं आहे. साई किशोरने न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘मला वाटतं की मी देशातल्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. मला कसोटीत संधी द्या, मी त्यासाठी सज्ज आहे. मला काही जास्त काळजी करण्याचं कारण नाही. रवींद्र जडेजा तिथे आहे. यापूर्वी मी त्याच्यासोबत रेड बॉल क्रिकेट खेळलो नाही. मी त्याच्यासोबत सीएसकेमध्ये होतो. पण रेडबॉल फॉर्मेटमध्ये एकत्र खेळलो नाही. त्यामुळे त्याच्यासोबत खेळलो तर मला खूप काही शिकता येईल. यावर माझा विश्वास आहे.’ भारत बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यापूर्वी त्याने केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
साई किशोरने 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाकडून खेळला आहे. या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक मिळवलं होतं. तीन सामन्यात त्याने 72 चेंडू टाकले आणि 63 धावा देत 4 गडी बाद केले. यात 12 धावांवर 3 गडी ही सर्वोत्तम खेळी राहिली. तर आयपीएलमध्ये साई किशोर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समधून खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्समध्ये असताना त्याला संधी मिळाली नाही. पण गुजरातकडून 10 सामन्यात 186 चेंडू टाकले आणि 258 धावा देत 13 गडी बाद केले. आता या खेळीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. साई किशोर बुची बाबू स्पर्धेत कोयंबतूरमध्ये 21 ऑगस्टला होणाऱ्या हरियाणा विरूद्धच्या सामन्यात टीएनसीए इलेव्हन संघातून खेळणार आहे.
दुसरीकडे, साई किशोरची दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत टीम बी मध्ये निवड झाली आहे. या संघात तो रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल चहरसारख्या खेळाडूंसोबत खेळणार आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही इथपासून सुरुवात आहे.
टीम बी : अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, मोहित अवस्थी, एन जगदीसन (विकेटकीपर).