मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. या वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपमध्ये एकूण 45 दिवसांमध्ये 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 10 संघांमध्ये एका वर्ल्ड कपसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.या वनडे वर्ल्ड कपची लगबग सुरु आहे. त्यात आयसीसीने शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत. आयसीसीने 2024 मध्ये होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलंय. तसेच आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रमुख तारखा प्रसिद्ध केल्या आहेत.
टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या यजमानपदाचा मान हा वेस्टइंडिज आणि अमेरिकेकडे आह. या टी 20 वर्ल्ड कपला 4 जून पासून सुरुवात होणार आहे. तर 30 जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कप सामन्याचं आयोजन हे वेस्ट इंडिजमधील 7 आणि अमेरिकेतील 3 अशा 10 ठिकाणी करण्यात येणार आलं आहे. त्यानुसार विंडिजमध्ये एटींग्वा, बारबुडा, बारबाडोस, डोमिनिका, गयाना, सेंट लूसिया, सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईंस-त्रिनिदाद टोबॅगो इथे सामने पार पडणार आहेत. तसेच अमेरिकेतील डलास, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कमध्ये सामने पार पडतील.
या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 5-5 च्या हिशोबाने 4 ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे. या चारही ग्रुपमधील टॉप 2 टीम्स सुपर 8 साठी क्वालिफाय करतील. सुपर 8 राउंडसाठी 4-4 टीम 2 ग्रुपमध्ये विभागल्या जातील. या दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 अव्वल संघ हे सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला हा न्यूयॉर्कपासून काही अंतरावर असलेल्या आईजनहावर पार्क स्टेडियममध्ये खेळवण्यात येऊ शकतो.
दरम्यान अखेरचा टी 20 वर्ल्ड कप 2022 हा ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आला होता. हा वर्ल्ड कप इंग्लंड क्रिकेट टीमने जिंकला होता. तर टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास हा सेमी फायनलमध्येच संपला होता. सेमी फायनलमध्ये टीम इंडिया-इंग्लंड विरुद्ध आमनेसामने होते. इंग्लंडने या सामन्यात टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला होता. इंग्लंडने टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता 2024 ला होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा धमाका करण्याचा प्रयत्न असणार आहे.