आयसीसीकडून बेस्ट टी 20 टीम ऑफ द ईयरची घोषणा, भारताच्या या 3 खेळाडूंची निवड
आयसीसीने बेस्ट टी 20 टीम ऑफ 2022 ची घोषणा केली आहे. यामध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. तर टीम इंडियाच्या एकूण 3 स्टार खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने 2022 या वर्षातील टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. आयसीसीने 2022 या वर्षातील खेळाडूंची कामगिरी पाहता एकूण 11 जणांची निवड केली आहे. या 11 खेळाडूंमध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या जॉस बटलरला या बेस्ट टी 20 टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.
टीम इंडियाच्या 3 खेळाडूंची निवड
आयसीसीने निवडलेल्या बेस्ट टी 20 प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘रनमशीन’ विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऑलराउंडर हार्दिक पांड्या या त्रिमूत्रींचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंसाठी 2022 हे वर्ष अविस्मरणीय राहिलं. विराटने या वर्षात एशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या. तसेच सूर्यकुमार 2022 या वर्षातील सर्वोत्तम टी 20 फलंदाज ठरला.
सूर्यकुमार यादव
सूर्यकुमारसाठी 2022 वर्ष कधीही न विसरता येणार आहे. सूर्यकुमार एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. सूर्याने 1 हजार 164 धावा केल्या. यामध्ये 2 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 189.68 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या. तसेच सूर्याने 2022 या वर्षाचा शेवट टी 20 क्रिकेटमधील एक नंबर फलंदाज म्हणून केला.
हार्दिक पांड्या
स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली. पांड्याने 2022 मध्ये 607 धावा केल्या. तसेच 20 विकेट्सही घेतल्या.
आयसीसी टी 20 सर्वोत्तम टीम
जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद रिजवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सैम कुर्रन, वानिंदु हसरंगा, हारिस रऊफ आणि जोश लिटिल.
दरम्यान टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना हा मंगळवारी 24 जानेवारीला इंदूरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून न्यूझीलंडला क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर तिसरा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न हा न्यूझीलंडचा असेल. टीम इंडियाने ही मालिका जिंकल्याने तिसऱ्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.