मोहम्मद शमीच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट, टीम इंडियात केव्हा परतरणार?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला दांडगा अनुभव आहे. शमीचं चॅम्पियन्स ट्रॉफीतून टीम इंडियात कमबॅक झालं तर रोहितसेनेची ताकद आणखी वाढेल.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर टीम इंडिया नववर्षात मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणारे. त्यानंतर बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापत झाली आहे. त्यामुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. अशात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शमी दुखापतीमुळे टीम इंडियापासून अनेक महिने दूर आहे. मात्र शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे शमीचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.
शमीच्या दुखापतीबाबत अपडेट काय?
शमीचं लवकरच टीम इंडियात कमबॅक अपेक्षित आहे. रेव्ह स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, मोहम्मद शमीला आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे शमी 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार्या आयसीसीच्या स्पर्धेत खेळताना दिसेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसेच शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत धारदार बॉलिंगने धमाका केला होता. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत शमीला पुन्हा एकदा ब्लू जर्सीत पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत.
शमीने विजय हजारे ट्रॉफीतूनही आपण दुखापतीतून पूर्णपणे फिट झाल्याचं सिद्ध करुन दाखवलंय. इतकंच नाही, तर शमीने बॅटिंगनेही धमाका केलाय. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, हेड कोच गौतम गंभीर आणि आणि कर्णधार रोहित शर्मा याच्यांत 11 जानेवारीला बैठक होणार आहे. तर 12 जानेवारी ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे निवड समिती शमीबाबत काय निर्णय घेते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान मोहम्मद शमी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील फायनलमध्ये खेळला होता. तेव्हापासून शमी टीम इंडियातून बाहेर आहे. शमीने टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आता शमीची वर्ल्ड कप फायनलनंतर थेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून टीम इंडियात रिएन्ट्री होते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.