Sachin Tendulkar | सचिनच्या हातात 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्ड कप ट्रॉफी, आयसीसीच्या निर्णयामुळे चाहते खूश
Icc World Cup 2023 Sachin Tendulkar | टीम इंडियाने अखेरचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2011 साली जिंकला होता. तब्बल 6 व्या स्पर्धेत सचिनचं देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आता सचिन पुन्हा आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसणार आहे.
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा 5 ऑक्टोबरपासून श्रीगणेशा होत आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. वर्ल्ड कपआधी 4 सप्टेंबर रोजी एकूण 10 संघाचे कर्णधार एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याआधी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची वर्ल्ड कप ग्लोबल अॅम्बेसडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सचिनला ग्लोबल अॅम्बेसडर म्हणून बहुमान देण्यात आला आहे. त्यानुसार आता सचिन गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी मैदानात आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन येणार आहे. त्यासह वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात झाल्याची घोषणा सचिन करेल. “1987 साली बॉल बॉय ते 6 स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा वर्ल्ड कपमधील प्रवास हा माझ्या हृद्याच्या एका कोपऱ्यात मी साठवून ठेवला आहे. आयसीसी वर्ल्ड कप 2011 हा माझ्या कारकीर्दीतील अविस्मरणी असा होता”, असं सचिनने प्रसिद्धपत्रकात म्हटलंय.
वर्ल्ड कप स्पर्धेांमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असं सचिनने म्हटलंय. “भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अनेक संघ सज्ज आहेत. या संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. मी आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची वाट पाहत आहे. वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळल्याने युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते. या वर्ल्ड कपमुळे युवा वर्गाला खेळाजवळ येण्याची आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची प्रेरणा मिळेल”, असं सचिनने म्हटलं.
सर्वात यशस्वी फलंदाज
दरम्यान सचिन क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सचिनने आपल्या वयाच्या 19 व्या वर्षी पहिला वर्ल्ड कप खेळला होता. सचिनने जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तोवर त्याने अनेक विश्व विक्रम आपल्या नावावर केले होते. सचिनने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सचिन वर्ल्ड कपमध्ये एकूण 2 हजार धावा करणारा एकमेव क्रिकेटर आहे. तसेच सचिनच्याच नावावर एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 663 धावा करण्याचा विश्व विक्रम आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.