मुंबई : टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 1 डाव आणि 132 धावांनी मिळवलेल्या विजयाचं टीम इंडियाला बक्षिस मिळालं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर 1 टीम ठरली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पछाडत अव्वल क्रमांक पटकावला आहे. टीम इंडिया यासह अनुक्रमे वनडे, टी 20 आणि कसोटीतही नंबर 1 टीम ठरली आहे. टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असण्याची ही पहिली वेळ ठरली आहे. यासह टीम इंडियाच्या खेळाडूंनीही रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
आयसीसीकडून दर बुधवारी क्रमवारी जाहीर करण्यात येते. आयसीसीने नागपूर कसोटीनंतर ही रँकिंग जाहीर केली, त्यामुळे टीम इंडियाला मोठा फायदा झाला. ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाचे 115 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या नावावर 111 रेटिंग्स पॉइंट्सची नोंद आहे.
टीम इंडियाने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत धमाकेदार विजय मिळवला. रोहितसेनेने ऑस्ट्रेलियाचा 1 डाव आणि 132 धावांनी खुर्दा उडवला. विशेष म्हणजे 5 दिवसांचा सामना अडीच दिवसातच निकाली निघाला. या कामगिरीमुळे टीम इंडियाला मोठा फायदा झाला.
टीम इंडिया 1973 साली पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचली होती. त्यानंतर टीम इंडियाला अनेक दशकं प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियान 2009 मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वामध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली होती. टीम इंडियाने हे अव्वल स्थान तब्बल 2011 पर्यंत अबाधिक ठेवलं होतं. त्यानंतर विराट कोहलीने टीम इंडियाला 2016 मध्ये नंबर 1 केलं. तेव्हापासून ते 2020 पर्यंत टीम इंडिया नंबर 1 राहिली.
टेस्ट रँकिंग, टीम इंडिया, नंबर 1, रेटिंग्स पॉइंट्स – 115
टी-20 रँकिंग, टीम इंडिया, नंबर 1, रेटिंग्स पॉइंट्स – 267
वनडे रँकिंग, टीम इंडिया, नंबर 1, रेटिंग्स पॉइंट्स – 114
टीमसोबत खेळाडूही रँकिगमध्ये चमकले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही मोठा फायदा झाला आहे. रोहित शर्माने नागपूर कसोटीत शतक ठोकलं होतं. यामुळे रोहित फलंदाजांच्या क्रमवारीत 8 व्या स्थानी पोहचला आहे. तर ऋषभ पंत 7 व्या क्रमांकावर आहे.
आर अश्विन याने गोलंदाजांमध्ये दु्सऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अश्विनने नागपूर कसोटीत एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्याशिवाय जसप्रीत बुमराह 5 व्या स्थानी कायम आहे. तर ऑलराउंडर्सच्या यादीत रविंद्र जडेजा पहिल्या स्थानी आहे. तर आर अश्विनही दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना हा 17-21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.