मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली क्रिकेटपटूवर पाच वर्षांची बंदी, आयसीसीचा दणका
टी20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असताना आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणात आरोपी असलेल्या क्रिकेटपटूवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. दोषी आढळल्याने आयसीसीने ही कारवाई केली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी संघांची घोषणाही झाली आहे. तसेच महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेसाठी संघांनी कंबर कसली आहे. जेतेपदासाठी महिनाभर जयपराजयाचं गणित अनुभवता येणार आहे. असं असताना आयसीसीने एका क्रिकेटपटूला दणका दिला आहे. मॅच फिक्सिंगप्रकरणी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेव्हॉन थॉमसवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. थॉमस यांच्यावर सात नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. आयसीसीने केलेल्या तपासात सातही आरोप खरे असल्याचं निष्पन्न झालं आहे. थॉमस यानेही आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत. वेस्ट इंडिजचा फलंदाज डेव्हॉन थॉमस याने श्रीलंका क्रिकेट, अमिराती क्रिकेट बोर्ड आणि कॅरेबियन प्रीमियर लीगच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.
गेल्या वर्षी 23 मे रोजी डेव्हॉन थॉमसवर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. त्यावेळी थॉमसचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं होतं. आता दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 34 वर्षीय डेव्हॉन थॉमसने 2009 मध्ये वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, 2011 विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाचा भाग असलेल्या थॉमसने 2022 मध्ये वेस्ट इंडिजसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
थॉमसने आपल्यावरील सर्व आरोप मान्य केल्याने त्याची 18 महिन्यांनी कमी केली आहे. त्याची शिक्षा 23 मे 2023 पासून सुरु झाली असून 22 मे 2028 पर्यंत असेल. या दरम्यान थॉमस आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू शकणार नाही. आयसीसी जनरल मनेजर अलेक्स मार्शल यांनी सांगितलं की, “आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही ठिकाणी प्रोफेशनल क्रिकेट खेळलेला थॉमसने अँटी करप्शनची ट्रेनिंग घेतली आहे. असं असूनही त्याने तीन देशांच्या फ्रेंचायसी लीगमध्ये करप्शनला प्रोत्साहन दिलं. त्याला मिळालेली शिक्षा इतर खेळाडूंसाठी उदाहरण आहे.”
डेव्हॉन थॉमसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजसाठी एक कसोटी, 21 वनडे आणि 12 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत 31, वनडेत 238 आणि टी20 मध्ये 51 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करत एकूण चार गडी बाद केले आहेत.