AUS vs IND Head To Head: टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोण वरचढ? टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाची कामगिरी कशी?
Australia vs India Head To Head Record: ऑस्ट्रेलियाला सुपर 8 मधील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया विरुद्धचा सामना हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सुपर 8 मोहिमेतील आपला तिसरा आणि अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. हा सामना 24 जून रोजी होणार आहे. टीम इंडियाने सुपर 8 मधील पहिले 2 सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत केल्याने टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी अधिक आहे. तर पहिल्या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने कांगारुंना पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडिया विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो असा आहे. या सामन्यानिमित्ताने आपण उभयसंघातील आकडेवारी जाणून घेऊयात.
टीम इंडियाने 2007 साली कांगारुंना पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर दोन्ही संघ 2010 साली आमनेसामने आले. तेव्हा कांगारु विजयी झाले. ऑस्ट्रेलियाने 2012 साली पुन्हा विजय मिळवला. मात्र त्यानंतर कांगारुंना अद्याप टीम इंडिया विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये जिंकता आलेलं नाही.
टीम इंडिया 2012 नंतर अजिंक्य
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 2014 टी 20 वर्ल्ड कपमध्ये 73 धावांनी पाणी पाजलं. तर 2016 साली 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडिया 2021 साली साखळी फेरीतून बाहेर पडली आणि कांगारु विश्व विजेते ठरले. तर 2022 साली ऑस्ट्रेलियाचं पहिल्याच फेरीतून पॅकअप झालं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पराभूत झाली. त्यानंतर आता उभयसंघात 24 जून रोजी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
सुपर 8 मध्येही वरचढ
दरम्यान टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 5 वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाला 2 सामन्यात यश आलं आहे. दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप सुपर 8 मध्ये एकूण 4 वेळा भिडले आहेत. इथे मात्र बरोबरीची लढत आहे. दोन्ही संघाने प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. तसेच नॉक आऊटमध्ये दोन्ही संघाची एकदाच लढत झाली. टीम इंडियाने 2007 साली ऑस्ट्रेलियाला 15 धावांनी लोळवलं होतं. तसेच टी 20I क्रिकेट इतिहासात टीम इंडियाच ऑस्ट्रेलियावर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने एकूण 31 पैकी 19 सामने जिंकले आहेत. तर कांगारुंना 11 सामन्यात यश आलं आहे. त्यामुळे आता 32 व्या सामन्यात कोण विजयी होणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झाम्पा.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.