T20 Women World Cup 2023 : सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या संघाने महिला टी-20 वर्ल्ड कपवर कोरलं नाव, आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव
आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहाव्यांदा वर्ल्डकप चषकावर नाव कोरलं आहे.
T20 Women World Cup 2023 : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहाव्यांदा वर्ल्डकप चषकावर नाव कोरलं आहे. तर सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकत हॅट्रिक साधली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचं पहिला वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला आपल्यावरील चोकर्सचा डाग या स्पर्धेतही पुसता आलेला नाही. फायनलमध्ये 156 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला 137 धावाच करता आल्या. 19 धावांनी यजमान आफ्रिकेचा पराभव झाला आहे. अॅशले गार्डनरला मालिकावीर, तर बेथ मूनीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा डाव
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 157 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. 20 षटकांच्या झटपट खेळात धीम्या गतीने फलंदाजी केल्याने फटका बसला. ताझमिन ब्रिट्सच्या रुपाने पहिला झटका दक्षिण आफ्रिकेला बसला. संघाच्या 17 धावा असताना ती केवळ 10 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर आलेली मरिझेन्न कॅप्पही चांगली खेळी करून शकली नाही. 11 चेंडूत 11 धावा करून बाद झाली. त्यानंतर अवघ्या 2 धावा करून सुने लूस तंबूत परतली. संघाची बिकट अवस्था असताना लॉरा वॉलवॉर्ड्टनं एकाकी झुंज सुरु ठेवली होती. मात्र 48 चेंडूनत 61 धावा करून बाद झाली आणि संघाच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तिने 48 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा डाव
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एलिसा हिली आणि बेथ मूनी या जोडीने पहिल्या गड्यासाठी 36 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एलिसा हिला 18 धावांवर बाद झाली. मरिझेन कॅप्पनं तिला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर अॅशले गार्डनर आणि एलिसा हिली या जोडीने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात क्लोइ ट्रायन हीला यश आलं. तिने अशले गार्डनरला 29 धावांवर तंबूत धाडलं. त्यानंतर आलेली ग्रेस हॅरिस चांगली कामगिरी करू शकली नाही. अवघ्या 10 धावा करून बाद झाली. मेग लॅनिंग हि सुद्धा 10 धावा करून तंबूत परतली. एकीकडे विकेट पडत असताना बेथ मूनीनं एकाकी झुंज सुरुच ठेवली आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर इलिसे पेरी ही 7 धावांवर बाद झाली आणि जॉर्जिया वारेहमला आपलं खातंही खोलता आलं नाही.बेथ मूनी नाबाद 74 आणि ताहिला मॅकग्राथ नाबाद 1 धावांवर राहिली.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास
ऑस्ट्रेलियाने वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. या स्पर्धेत विजयी घोडदौड पहिल्या सामन्यापासून सुरु ठेवली ती अखेरपर्यंत..साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलँडला 97 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 173 धावांचं आव्हान दिलं होतं. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात बांगलादेशनं 7 गडी गमवून 107 धावांचं आव्हान दिलं होतं.
हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून 18.2 षटकात पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं 20 षटकात 8 गडी गमवून 112 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने बिनबाद 15.5 षटकात पूर्ण केलं. चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी आणि 21 चेंडू राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात 6 गडी गमवून 124 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून 16.3 षटकात पूर्ण केलं.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा करू शकला.
टी20 वर्ल्डकपमध्ये या संघांनी जेतेपदावर कोरलं नाव
- 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड), इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
- 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड) ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी हा सामना जिंकला.
- 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी हा सामना जिंकला.
- 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हा सामना जिंकला.
- 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज) वेस्ट इंडिजने 8 गडी राखून सामना जिंकला.
- 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला.
- 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत) ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाचा संघ – एलिसा हिली, बेथ मूनी, अशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग, एलिसे पेरी, जॉर्जिया वारेहम, ताहिला मॅकग्राथ, जेस जोनास्सेन, मेगन स्कट, डार्सी ब्राउन
दक्षिण आफ्रिका संघ – लॉरा वॉलवॉर्ड्ट, ताझमिन ब्रिट्स, मरिझेन कॅप्प, सुने ल्यूस, क्लोइ ट्रायन, नादिन डी क्लर्क, अन्नेक बॉश, सिनालो जाफ्ता, शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा