आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 14 व्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट टीम फुस्स ठरली आहे. पाकिस्तानला आपल्या वर्ल्ड कप मोहिमेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला तिहेरी आकडाही गाठू दिला नाही. पाकिस्तानचा डाव हा 19.5 ओव्हरमध्ये आटोपला. पाकिस्तानला 82 धावाच करता आल्या. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 83 धावांचं आव्हान मिळालं आहे. पाकिस्तानची बॉलिंग ही जमेची बाजू आहे. त्यामुळे पाकिस्तानचे गोलंदाज हे 82 धावांचा बचाव करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानकडून एकूण चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर अपयशी ठरल्या. पाकिस्तानकडून आलिया रियाझ हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. आलियाने 32 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. सिद्रा आमिन आणि इरम जावेद या दोघींनी प्रत्येकी 12-12 धावांचं योगदान दिलं. तर निदा दार हीने 10 धावा केल्या. तर इतरांनी कांगारुंच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाकडून ऍशलेग गार्डनर हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ॲनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहॅम या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मेगन शुट आणि सोफी मोलिनक्स या दोघींनी 1-1 विकेट मिळाली.
दरम्यान पाकिस्तानची नियमित कर्णधार फातिमा सना ही वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान वडिलांच्या निधनामुळे मायदेशी परतली आहे. त्यामुळे तिच्या अनुपस्थितीत मुनीबा अली ही कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. फातिमा बॅटिंग आणि बॉलिंगने याआधीच्या सामन्यात योगदान दिलंय. त्यात आता ती नसल्याने पाकिस्तानला तिची उणीव भासत आहे. अशाच आता पाकिस्तानचे गोलंदाज तिच्या अनुपस्थितीत काय कामगिरी करतात? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मुनीबा अली (कर्णधार आणि विकेटकीपर), सिद्रा अमीन, निदा दार, सदफ शमास, आलिया रियाझ, इरम जावेद, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल आणि सय्यदा अरूब शाह.
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि टायला व्लामिंक.