World Cup 2023 : ज्या स्टेडिअमवर bcci ने 100 कोटी खर्च केले, त्यावर एकही मॅच नाही होणार!
ICC World Cup 2023 : बीसीसीआयसुद्धा आता तयारीला लागलं असून आता आशिया कप आणि त्यानंतर मिशन वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड करणं मोठं आव्हान असणार आहे. मात्र वेळापत्रकांनुसार बीसीसीआयने ज्या स्टेडिअमवर 100 कोटींपक्षा खर्च केले त्यावर सामना होणार नाही.
मुंबई : यंदा भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक आयसीसीने शेअर केलं आहे. देशातील 10 राज्यांमध्ये वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. सेमी फायनल आणि फायनलसह एकूण 48 सामने होणार आहेत. बीसीसीआयसुद्धा आता तयारीला लागलं असून आता आशिया कप आणि त्यानंतर मिशन वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड करणं मोठं आव्हान असणार आहे. मात्र वेळापत्रकांनुसार बीसीसीआयने ज्या स्टेडिअमवर 100 कोटींपक्षा खर्च केले त्यावर सामना होणार नाही.
एप्रिलमध्ये पीटीआयने दिलेल्या अहवालानुसार, बीसीसीआयने येत्या वर्ल्ड कप 2023 च्या तयारीसाठी 5 भारतीय मैदानांवर एकूण 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. या 5 मैदानांमध्ये हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि मोहालीचा समावेश आहे. दिल्लीच्या मैदानासाठी 100 कोटी, हैदराबादसाठी 117.17 कोटी, कोलकाताच्या ईडन गार्डनसाठी127.47 कोटी आणि मोहालीच्या जुन्या पीसीए स्टेडियमसाठी 79.46 कोटी खर्च केले होते. असा एकूण 500 कोटींचा खर्च बीसीसीआयने केला होता.
बीसीसीआयने हैदराबादमधील स्टेडिअमसाठी 117 कोटी खर्च केले आहेत. त्या मैदानावर टीम इंडियाचा एकही होणार नसून वर्ल्ड कपमधील फक्त 3 सामने पार पडले जाणार आहेत. टीम इंडियाचे हैदाराबाद सोडून चेन्नई, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, धर्मशाला, लखनौ, दिल्ली, पुणे आणि बंगळुरू या मैदानांवर सामने होणार आहेत. या वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत टीम इंडियाचा सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे.
टीम इंडियाचे होणारे सामने :-
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई.
टीम इंडिया विरुद्ध अफगानिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश – 19 ऑक्टोबर, पुणे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाळा.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 2 नोव्हेंबर, मुंबई.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 5 नोव्हेंबर, कोलकाता.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 11 नोव्हेंबर, बंगळुरु.
दरम्यान, टीम इंडियासाठी हा वर्ल्ड कप महत्त्वाचा असून गेली 10 वर्षे टीम इंडियाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा याला इतिहास रचण्याची मोठी संधी असणार आहे. महेंद्र सिंग धोनीनंतर टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला आयसीसीची ट्रॉफी मिळवता आली नाही.