World Cup 2023 नंतर पाकिस्तानला मोठा झटका, या दिग्गजाचा टीमला रामराम
Icc World Cup 2023 | पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट टीम वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर आता मोठा झटका लागला आहे. नक्की काय झालंय?
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीतील सामने पार पडले आहेत. वर्ल्ड कपमधून 6 संघ बाहेर पडले आहेत. तर सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 4 संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स, श्रीलंका आणि इंग्लंड हे 6 संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडले. पाकिस्तान टीमची या स्पर्धेत अतिशय वाईट कामगिरी राहिली. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधील 9 पैकी 4 सामन्यात विजय मिळवता आला. तर 5 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर आता आणखी एक झटका लागला आहे.
वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पाकिस्तान बॉलिंग कोच मॉर्ने मोर्केल याने पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मोर्ने मोर्केल याचा पीसीबीसोबत 6 महिन्यांचा करार होता. मोर्नेने करार संपल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्या पडल्या मोर्ने टीममधून बाहेर झाल्याने क्रिकेट बोर्ड आणि बॉलिंग कोच यांच्यात वादावादी झाल्याचीही चर्चा रंगली आहे.
मोर्ने मॉर्केल याने पाकिस्तानचा बॉलिंग कोच म्हणून 6 जून रोजी पदभार स्वीकारला होता. पीसीबी आणि मोर्ने यांच्यात एकूण 6 महिन्यांसाठी हा करार होता. मोर्नेच्या मार्गदर्शनात पाकिस्तानने श्रीलंका दौरा केला होता. हा एकूण 2 कसोटी सामन्यांचा दौरा होता. पाकिस्तानने या दोन्ही सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता.
पाकिस्तानला मोठा झटका
Morne Morkel resigns as Pakistan bowling coach
Details here ⤵️ https://t.co/El3BgWVbjh
— PCB Media (@TheRealPCBMedia) November 13, 2023
दरम्यान आता पाकिस्तानचा पुढील बॉलिंग कोच, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. पाकिस्तान टीम वर्ल्ड कपनंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 14 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इफ्तिखार अहमद, सौद शकील, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ, शादाब खान, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज आणि हसन अली.