लंडन : भारतात नुकताच IPL 2023 चा सीजन संपला. या सीजनमध्ये महत्वाच्या सामन्यात फायनलमध्ये पावसाने बाधा आणली. पावसामुळे फायनलचा सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवावा लागला. रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा पाऊस कोसळला. त्यामुळे सामन्याला बराच विलंब झाला. यावेळी पीच सुकवण्यासाठी स्पंजचा वापर झाल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे क्रिकेट विश्वातील श्रीमंत बोर्ड BCCI ची लाज निघाली. आता इंग्लंडच्या द ओव्हल मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना सुरु आहे.
WTC च्या फायनलवरही पावसाच सावट आहे. या टेस्टच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे. आयपीएल सारखीच WTC फायनलची स्थिती होऊ नये, अशी क्रिकेट चाहत्यांच्या मनात भिती आहे.
मैदानाचा ओलसरपणापासून चांगला बचाव
पाऊस जरी आला, तरी IPL सारखी WTC फायनलची स्थिती होणार नाही, याचं कारण आहे ओव्हल मैदानावरील कव्हर्स. मॅच दरम्यान इंग्लंडमध्ये पाऊस सुरु झाल्यास, कव्हर्स मैदानावर आणायला फार वेळ लागत नाही. या कव्हर्समुळे मैदानाचा ओलसरपणापासून चांगला बचाव होतो.
इंग्लंडमधील कव्हर्सच वेगळे
मैदानावरील अंपायर्सनी इशारा करताच लगेच कव्हर्स येतात. खेळपट्टी पूर्णपणे झाकली जाते. पीचवर पाणी येणार नाही, अशा पद्धतीने खेळपट्टी झाकली जाते. पीचवर पाणी येत नाही, कारण इंग्लंडमधील कव्हर्सच वेगळे आहेत.
होव्हर कव्हर्स वैशिष्ट्य काय?
इंग्लंडमधल्या कव्हर्सला होव्हर कव्हर्स म्हटलं जातं. 1998 पासून हे होव्हर कव्हर्स उपलब्ध आहेत. पाऊस येताच मैदान लगेच झाकता यावं, यासाठीच हे कव्हर्स बनवण्यात आले आहेत. होव्हर कव्हर्स मैदानावर आणण्यासाठी फक्त 4 ते 5 लोक लागतात. अन्य कव्हर्सना मैदानावर आणण्यासाठी कमीत कमी 10 मिनिट लागतात. तेच होव्हर कव्हर्स तीन मिनिटात मैदानावर आणता येतात.
एयर सर्कुलेशन यूनिट
या कव्हर्सना अशा पद्धतीने डिजाइन केलय की, फक्त सहज ढकलून मैदानावर आणता येतं. या कव्हर्समुळे मैदान खराब होत नाही तसच कुठलीही निशाणी तयार होत नाही. होव्हर कव्हर्समध्ये एयर सर्कुलेशन यूनिट असतं. त्यामुळे मैदान सुकवण्याची प्रोसेस विशेष जलदगतीने होते.
भारतात होव्हर कव्हर्स कुठे वापरले जातात?
मैदानाच्या गरजेनुसार, हे कव्हर्स बनवले जातात. या कव्हर्समध्ये 20 हॉर्स पावरचे दोन इंजिन असतात. सर्वप्रथम लॉर्ड्सच्या मैदानात या कव्हर्सचा वापर करण्यात आला. त्याशिवाय बर्मिंघम, एजबेस्टन, नॉटिंघम आणि इंग्लंडच्या अन्य मैदानात होव्हर कव्हर्स वापरले जातात. बांग्लादेशमध्ये ढाका आणि भारतात पुण्यात होव्हर कव्हर्सचा वापरले जातात.