T20 World Cup :…जर असं झालं तर अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका, जाणून घ्या संपूर्ण गणित
टी20 वर्ल्डकप जेतेपदासाठी अवघ्या तीन सामन्यांचा अवकाश आहे. तीन सामन्यानंतर नवव्या पर्वाचा मानकरी ठरेल. उपांत्य फेरीच्या लढती 27 जूनला भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. पण या स्पर्धेत इंग्लंड आणि अफगाणिस्तानची धाकधूक वाढली आहे. कारण सामना न खेळताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा आता शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. उपांत्य फेरी आणि त्यानंतर अंतिम फेरीचा सामना असणार आहे. भारत, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना होणार आहे. पण या दोन्ही सामन्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला सकाळी 6 वाजता दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा व्यत्यय आल्यास एक दिवस राखीव आहे. पण भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी राखीव दिवस नाही. 27 जूनला रात्री 8 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काही तास राखून ठेवले आहेत. या सामन्यासाठी सामन्याच्या तीन तासांव्यतिरिक्त 4 तास 10 मिनिटं राखीव आहेत.
दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर दुसरा दिवस आहे. पण त्या दिवशीही सामना होऊ शकला नाही तर दक्षिण अफ्रिकेला पुढचं तिकीट मिळेल. कारण गट दोन मधून दक्षिण अफ्रिका संघ तीन पैकी तीन सामने जिंकून अव्वल स्थानी आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पुढचं तिकीट मिळेल. तर अफगाणिस्तानला सामना न खेळताच गाशा गुंडाळावा लागेल.
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात असंच समीकरण आहे. एकतर या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. चार तासात पाऊस गेलाच नाही तर सामना रद्द करण्याशिवाय गत्यंतर नाही. गयाना येथील सामन्यात पाऊस पडेल अशी 88 टक्के शक्यता आहे. तर मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी 18 टक्के शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार यात शंका नाही. सामना रद्द करण्याची वेळ आली तर भारताला संधी मिळेल. कारण गट एक मधून तीन पैकी तीन सामने जिंकू भारत टॉपला आहे. अंतिम फेरीचा सामना 29 जूनला असून या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. आता अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळतं? याची उत्सुकता लागून आहे.