IML T20 2025 Final : इंडियाच ‘मास्टर्स’, अंतिम सामन्यात विंडीज मास्टर्सवर 6 विकेट्सने विजय
India Masters vs West Indies Masters 2025 Final Result : अंबाती रायडू याने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर इंडिया मास्टर्सने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 ची ट्रॉफी इंडिया मास्टर्सने जिंकली आहे. सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वात इंडिया मास्टर्सने ही कामगिरी करुन दाखवली आहे. वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्सला विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं होतं. इंडियाने हे आव्हान 17 बॉलआधी 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. इंडियाने 17.1 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या. अंबाती रायुडू हा विजयाचा शिल्पकार ठरला. तर इंडियाच्या विजयामुळे विंडीजला उपविजेता म्हणून मायदेशी परतावं लागणार आहे.
इंडिया मास्टर्सची बॅटिंग, अंबाती रायडू चमकला
इंडियाच्या विजयात रायडूने प्रमुख भूमिका बजावली. रायडूने 50 बॉलमध्ये 148 च्या स्ट्राईक रेटने 74 रन्स केल्या. रायडूच्या या खेळीत 3 सिक्स आणि 9 फोरचा समावेश होता. कॅप्टन सचिन तेंडुलकर याने 18 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 25 रन्स केल्या. मधल्या फळीत गुरुकिरत सिंह मान याने 14 धावा केल्या. युसूफ पठाण याला भोपळाही फोडता आला नाही. तर युवराज सिंह आणि स्टूअर्ट बिन्नी या जोडीने इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं.
युवराज ने 11 बॉलमध्ये 1 फोरसह नॉट आऊट 13 रन्स केल्या. तर स्टूअर्ट बिन्नी याने 9 चेंडूत 177.78 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 16 रन्स केल्या. स्टुअर्टने या खेळीत 2 सिक्स झळकावले. तर विंडीजकडून एश्ले नर्स याने 2 विके्टस घेतल्या. तर टिनो बेस्ट आणि सुलेमान बेन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
सचिनच्या नेतृत्वात इंडिया ‘मास्टर्स’
India Masters – The First – Ever 𝐈𝐌𝐋𝐓𝟐𝟎 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬! 🏆
They conquer the Grand Finale, defeating #WestIndiesMasters by 6️⃣ wickets! An incredible match & an unforgettable season – #IMLT20 Season 1 belongs to #IndiaMasters! 🙌
#TheBaapsOfCricket pic.twitter.com/LOkAmdHp4v
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 16, 2025
इंडिया मास्टर्स प्लेइंग इलेव्हन: सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायुडू (विकेटकीपर), पवन नेगी, युवराज सिंग, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, शाहबाज नदीम आणि धवल कुलकर्णी.
वेस्ट इंडिज मास्टर्स प्लेइंग इलेव्हन: ब्रायन लारा (कॅप्टन), ड्वेन स्मिथ, विल्यम पर्किन्स, लेंडल सिमन्स, चाडविक वॉल्टन, दिनेश रामदिन (विकेटकीपर), अॅशले नर्स, टिनो बेस्ट, जेरोम टेलर, सुलेमान बेन आणि रवी रामपॉल.