ऑस्ट्रेलियात पत्रकाराकडून डिवचण्याचा प्रयत्न! जसप्रीत बुमराहने दिलं असं उत्तर की बोलती बंद
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका आहे. यातील पहिला सामना पर्थमध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी पहिल्या सामन्यात कर्णधार असलेला जसप्रीत बुमराह पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना जसप्रीत बुमराहने पत्रकाराची बोलती बंद केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना सुरु होत आहे. ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करणार? हे पहिल्याच सामन्यात दिसून येईल. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यापूर्वी कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी जसप्रीत बुमराहला प्रश्न विचारताना पत्रकाराने त्याचा उल्लेख मध्यमगती गोलंदाज कर्णधार म्हणून केला. असा उल्लेख करताच जसप्रीत बुमराहला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने तात्काळ पत्रकाराची चूक दुरुस्त करत कान टोचले. पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारले की, ‘एक मध्यमगती अष्टपैलू म्हणून भारताचं कर्णधारपद भूषवताना कसं वाटतं?’ या प्रश्नावर जसप्रीत मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, ‘माझ्या मित्रा, मी 150 च्या वेगाने गोलंदाजी केली आहे. तू मला वेगवान गोलंदाज बोलू शकतो.’ असं बोलताच पत्रकार परिषदेत हास्यस्फोट झाला.
जसप्रीत बुमराहने पत्रकार परिषदेत काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. ‘मी कर्णधार म्हणून याकडे पाहात नाही. मला कायम जबाबदारी पार पाडण्यास आवडतं. मी लहानपणापासून कठीण कामं करत आलो आहे. त्यामुळे कठीण काळात काम करणं मला आवडतं आणि ही माझ्यासाठी एक नवं आव्हान आहे. तयारीचं बोलायचं तर आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. मला माझ्या संघावर विश्वास आहे आणि जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा स्थिती कशीही असे. तेव्हा आम्ही चांगलंच करतो.’, असं जसप्रीत बुमराह म्हणाला.
जसप्रीत बुमराहला यावेळी भविष्यात कर्णधारपद भूषविणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. ‘स्वाभाविकपणे मी रोहितला याबाबत सांगणार नाही की मी करतो. तो आमचा कर्णधार आहे आणि चांगलं काम करत आहे. आता हे फक्त एका सामन्यासाठी आहे. पण भविष्याबाबत कोणालाच माहिती नाही. पुढच्या सामन्यात चित्र बदलू शकतं आणि क्रिकेटमध्ये असंच होतं. मी सध्या वर्तमानात जगत आहे. मला एक जबाबदारी मिळाली आहे. यापूर्वीही एकदा पार पाडली आहे आणि मला मजा आली. मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. भविष्यात काय होईल हे माझ्या हातात नाही.’, असं जसप्रीत बुमराह म्हणाला.
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, परदीश कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल.