RR vs PBKS IPL 2023 : गुवाहाटीमध्ये पंजाब किंग्जने अटीतटीच्या सामन्यात मारली बाजी, राजस्थान रॉयल्सचा पराभव
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यामध्ये पंजाबने बाजी मारली आहे.
मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना अटीतटीचा झाला अखेर यामध्ये पंजाब किंग्जने 5 धावांनी विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेला सामना राजस्थान जिंकणार असं वाटत होतं. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 197 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ 192 धावा करू शकला.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पंजाब किंग्सच्या सलामीला आलेल्या प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन यांनी चुकीचा ठरवला. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. तर प्रभसिमरन सिंगने आक्रमकपणे अर्धशतक ठोकलं. त्याने 28 चेंडूत 50 धावा केल्या. विकेट्स हाती असल्यामुळे प्रभसिमरन सिंगने नंतर आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने 34 चेंडूत 60 धावा केल्या होत्या.
प्रभसिमरन बाद झाल्यावर शिखर धवनने आपल्या हाती सामन्याची सूत्रे घेतलीत. धवनने नाबाद 86 धावा केल्या यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यानंतर जितेश शर्माने 16 चेंडूत 27 धावांची आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या वाढवण्यास मदत केली. राजस्थानने 4 विकेट्स घेतल्या यातील जेसन होल्डरने 2 तर आर. आश्विने 1 गडी बाद केला.
राजस्थानची सुरूवात खराब झाली, सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल 11 धावा करून माघारी परतला, त्यानंतर आर. आश्विनही शून्यावर आऊट झाला. दोन्ही विकेट्स या अर्शदीप सिंगने घेतल्या होत्या. त्यानंतर आलेल्या जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक पवित्रा घेतला मात्र सहाव्या ओव्हरमध्ये नॅथन एलिसने त्याला 19 धावांवर बाद केलं. त्यासोबतच त्याने संजू 42 धावा, देवदत्त पडिक्कल 21 धावा, रियान पराग 20 धावांवर एलिसने यांना माघारी पाठवत सामना पंजाबच्या बाजूने झुकवला होता.
रियान आऊट झाल्यावर सर्वांना हेटमायर ही एकच आशा होती, त्यानेही सामना ओढला. 18 बॉलमध्ये 36 धावा केल्या. त्यासोबतच त्याला ध्रुव जुरेल या युवा खेळाडूनेही आक्रमक खेळी करत सर्वांची मनं जिंकलीत. शेवटच्या 12 बॉलमध्ये 34 धांवाची गरज होती मात्र हेटमायर रन आऊट झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॅम करनने टाकलेली शेवटची ओव्हर ज्यामध्ये एकही मोठा फटका खेळता आला नाही.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल