Video : वनडे वर्ल्डकप आधी शाहरूख खान याने दिले असे धडे, प्रशिक्षक कबीरचं चित्र राहील उभं
वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. आता किंग खान शाहरुखचा एक प्रोमो आयसीसीने ट्वीट केला आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकपपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या प्रोमोमध्ये किंग खान शाहरूख आणि त्याचा आवाजाची झलक पाहायला मिळते. हा प्रोमो इतका भारदस्त बनवला गेला आहे की प्रत्येक वेळी ‘चक दे इंडिया’तील प्रशिक्षक कबीर खानची आठवण येते. हे पात्र शाहरुख खानने साकारलं होतं. या चित्रपटात भारतीय महिला हॉकीपटूंनी त्याच्या मार्गदर्शनाखाली जेतेपद जिंकल्याचं दाखवलं आहे. रुपेरी पडद्यावरील त्याचे संवाद प्रत्येकालाच भावले आहेत. आता त्याचीच प्रचिती प्रत्येक क्रीडाप्रेमींना येत आहे.
वर्ल्डकप प्रोमोमध्ये शाहरूख खान
चक दे इंडिया चित्रपट भारतीय महिला हॉकी संघावर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात सामन्याच्या 70 मिनिटांबाबत सांगताना शाहरूख सर्व कसब लावतो. तसेच खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला यामुळे चालना मिळते. हा संवाद आजही कित्येक जण सहज बोलून जातात. आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 प्रोमोतही असंच काही दिसतं.
History will be written and dreams will be realised at the ICC Men's Cricket World Cup 2023 ?
All it takes is just one day ✨ pic.twitter.com/G5J0Fyzw0Z
— ICC (@ICC) July 20, 2023
70 मिनिटांऐवजी एका दिवसाचा उल्लेख
वनडे वर्ल्डकप प्रोमोमध्ये शाहरुख खान 70 मिनिटांऐवदी फक्त एका दिवसाचा उल्लेख करतो. बस एवढंच काय ते अंतर आहे. वनडे क्रिकेट हा काही 70 मिनिटांचा खेळ नसतो आणि त्यासाठी दिवस जातो. त्यामुळे संवादही तसेच काहीसे लिहिले आहेत.
5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत वनडे वर्ल्डकप
वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला आहे. भारताने पहिल्यांदाच संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं आहे. दुसरीकडे मायदेशात वर्ल्डकप असल्याने टीम इंडियाकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ आहे. वेस्ट इंडिज पहिल्यांदाच या वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही.
भारताने आयसीसी स्पर्धेचं जेतेपद जिंकून आता दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. भारताने शेवटचा आयसीसी चषक 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षात टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे आयसीसी वनडे वर्ल्डकप भारताने जिंकावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे.