कोरोनाच्या संकटामुळे मधूनच रद्द करण्यात आलेली आयपीएल (IPL 2021) पुन्हा सुरु होणार आहे. उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल. तर स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबरला खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाईल. तर या क्रिकेटच्या महासंग्रामाआधी या स्पर्धेत आतापर्यंत आपण अनेक रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेतलं. पण आता आपण जाणून घेणार आहोत. एका खराब रेकॉर्डबद्दल या स्पर्धेत सर्वाधिक धावा खाणारे गोलंदाज कोण? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तर या यादीत सर्वात पहिलं नाव येत आरसीबीच्या उमेश यादवचं (Umesh Yadav) उमेश ने आयपीएलमध्ये पाच वेळा एका सामन्यात 50 हून अधिक धावा दिल्या आहेत. उमेशने आय़पीएलमध्ये एकूण 121 सामने खेळले असून 119 विकेट्स घेत 3 हजार 579 रन दिले आहेत.
सध्या भारतीय कसोटी संघातील महत्त्वाचा गोलंदाज असणारा मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये पांच वेळा 50 हून अधिक धावा देणाऱ्या शमीने 2021 च्या पर्वात आठ सामने खेळले असून 234 धावा देत 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर संपूर्ण आयपीएल कारकिर्दीचा विचार करता त्याने 73 सामन्यात 2 हजार 241 धावांच्या बदल्यात 68 विकेट्स घेतले आहेत.
या दोघानंतर नंबर लागतो चेन्नई सुपरकिंग्सच्या शार्दूल ठाकूरचा (Shardul Thakur). शार्दूलने चार वेळा 50 हून अधिक धावा दिल्या आहेत. त्याने आतापर्यंत 52 सामन्यात 51 विकेट्स घेत 1 हजार 56 रन्स दिले आहेत.
ठाकुरनंतर नंबर लागतो मोहित शर्माचा (Mohit Sharma). मोहितने देखील चार वेळा एका सामन्यात 50 हून अधिक धावा दिल्या आहेत. 86 आयपीएल सामन्यात मोहितने 2 हजार 470 धावा खात 92 विकेट्स घेतले आहेत.
मोहितनंतर हैद्राबाद संघाच्या संदीप शर्मा (Sandip Sharma) याचा नंबर लागतो. त्यानेही चार वेळा 50 हून अधिक धावा दिल्या आहेत. तर एकूण 95 आयपीएल सामन्यात 110 विकेट्स त्याच्या नावावर असून 2 हजार 755 रन्सही त्याने दिले आहेत.
या सर्वांनंतर नंबर लागतो अशोक डिंडाचा (Ashok Dinda). सध्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या डिंडाने देखील चारहून अधिकदा आयपीएलमध्ये एका सामन्यात 50 हून अधिक धावा दिल्या आहेत. त्याने 78 सामन्यात 69 विकेट्स घेत 1 हजार 516 रन्स दिले आहेत.
या यादीत हर्षल पटेल (Harshal Patel) याचही नाव सामिल असून सध्या पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. असं असताना धावा खाण्यातही तो मागे नाही. आतापर्यंत चार वेळा त्याने 50 हून अधिक धावा खालल्या असून 55 आयपीएल सामन्यात 1 हजार 606 धावा दिल्या आहेत. सोबत 63 विकेट्सही घेतल्या आहेत.