IND vs AFG : रनआऊट प्रकरणात नेमकं कोण चुकलं रोहित की गिल? गावस्करने स्पष्टच सांगितलं की..
भारत अफगाणिस्तान टी20 सामन्यातील रोहित शर्माचं रनआऊट होणं कोण विसरू शकेल. सोशल मीडियावर या प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरु आहे. 14 महिन्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये परतलेला रोहित शर्माचं चुकलं की शुबमन गिलचं? यावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अशाच माजी क्रिकेटपटू रोहन गावस्करने संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : भारत अफगाणिस्तान टी20 मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. हा सामना भारताने जिंकला असला तरी या सामन्यातील रनआऊट प्रकरण चांगलंच गाजलं. कारण कायम खेळाडूंना सांभाळून घेणारा कर्णधार रोहित शर्मा भर मैदानात तापलेला दिसला. धावचीत होताच त्याने क्षणाचाही विलंब न करता नॉन स्ट्राईक एण्डला उभ्या असलेल्या शुबमन गिलवर बरसला. कारण 14 महिन्यानंतर टी20 संघात आगमन आणि टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने पायभरणी या दोन्ही मुद्द्यांसाठी रोहितचं खेळणं महत्त्वाचं आहे. कर्णधारपदाची धुरा खांद्यावर असताना शून्यावर बाद होणं त्याला रुचलं नसावं. त्यामुळे त्याची तात्काळ प्रतिक्रिया सर्वांसमोर आली. सामन्यानंतर रोहित शर्माने सारवासारव देखील केली. पण सोशल मीडियावर नेमकी कोणाची चूक हा वाद रंगला आहे. आता यात माजी क्रिकेटपटून रोहन गावस्कर याने उडी घेतली आहे. तसेच योग्यरित्या विश्लेषण करून नेमकं कोणाची चूक ते स्पष्ट केलं आहे.
रोहित शर्माने दुसरा चेंडू मिड ऑफच्या दिशेने तटावला. तसेच कॉल देत नॉन स्ट्राईक एण्डला धाव घेतली. पण हा कॉल गिलच्या लक्षातच आला नाही आणि रोहितला धावचीत होत तंबूत परतावं लागलं. रोहितने मारलेला चेंडू डाईव्ह मारून पकडला गेला. पण एक धाव आरामात घेतली जाईल याचा अंदाज रोहित शर्मा होता. त्याने क्रिझ सोडलं आणि नॉनस्ट्राईक एण्डला कॉल देत धाव घेतली. पण गिल बॉल पाहत राहिला आणि क्रिस काही सोडलं नाही. हे सर्व इतकं झटपट झालं की रोहित शर्मा त्याच्या बाजूला येऊन उभा राहीला. त्यानंतर काय घडलं हे सर्वांनी पाहिलं.
रोहन गावस्करने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, “ही धाव आरामात घेतली जाऊ शकली असती. खरं तर चालत जाऊनही धाव पूर्ण झाली असती. रोहित शर्मा हा शांत खेळाडू आहे. कर्णधार असूनही मैदानात राग व्यक्त करताना क्वचितच दिसतो. बॉल मिड ऑफच्या दिशेने गेला होता आणि हा स्ट्राईकरचा कॉल असतो. गिलने रोहितवर विश्वास ठेवणं गरजेचं होतं. कारण या कॉलमुळे रोहितच डेंजर एन्डला आला असता. कारण खेळाडूने विकेटकीपरकडे बॉल फेकला नसता.”
“शुबमन गिलची चूक आहे. कारण तो रोहितने मारलेल्या चेंडूकडे शेवटपर्यंत पाहात राहिला. त्याने रोहितच्या कॉलकडे सपशेल दुर्लक्ष केलं. त्यामुळेच रोहित त्याच्या बाजूला येऊन कधी उभा राहिला कळलंच नाही.”, असंही रोहन गावस्कर याने पुढे सांगितलं.