Asia Cup 2024 : उपांत्य फेरीत नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने, भारत अंतिम फेरी गाठणार का?
एसीसी मेन्स टी20 इमर्जिंग टीम आशिया कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात विजयी संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला.
एसीसी मेन्स टी20 इमर्जिंग टीम आशिया कप 2024 स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूने लागला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड दिसत आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत धडक मारेल. अंतिम फेरीत एका बाजूने श्रीलंकेने धडक मारली आहे. भारताने आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं होतं. त्यानंतर युएईचा धुव्वा उडला आणि तिसऱ्या आणि शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात ओमानला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, अफगाणिस्तानने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. श्रीलंकेला 11 धावांनी, तर बांगलादेशला 4 विकेट आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं. त्यानंतर हाँगकाँगकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. हाँगकाँगने 5 विकेट आणि 3 चेंडू राखून पराभूत केलं.
भारत अफगाणिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाली. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 20 षटकं खेळत 9 गडी गमवले आणि 135 धावा केल्या तसेच विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकने 16.3 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. यासह अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारत आणि अफगाणिस्तान यातील विजयी संघाशी लढत होईल. मागच्या पर्वात पाकिस्तानने जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र यावेळी उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंडिया अ (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चहर, रसिक दार सलाम, आकिब खान.
अफगाणिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): सेदीकुल्ला अटल, झुबैद अकबरी, दरविश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), करीम जनात, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी