जसप्रीत बुमराह याने अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या ‘त्या’ ॲक्शनचा केला खुलासा, म्हणाला…
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरु झाली आहे.पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह याने अनोखं सेलिब्रेशन केलं. त्या मागचं कारण आता त्याने सांगितलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. जय पराजयासह गुणतालिकेत उलटफेर दिसून येत आहे. भारताने या स्पर्धेत दोन सामने जिंकत दुसरं स्थान गाठलं आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला असल्याने पहिल्या स्थानावर आहे. आता भारत पाकिस्तान सामन्यानंतर गुणतालिकेत फरक दिसून येणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. पण या सामन्यापूर्वी भारताची लढत अफगाणिस्तानशी झाली होती. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा पहिला विकेट घेतल्यानंतर जसप्रीत बुमराह याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनबाबत जसप्रीत बुमराह याने खुलासा केला आहे. भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह आईचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी गेला होता. त्यावेळी त्याने आपल्या सेलिब्रेशन बाबत सांगितलं.
तसं सेलिब्रेशन करण्यामागचं कारण काय?
जसप्रीत बुमराह हा मॅनचेस्टर युनायटेडचा चाहता आहे. त्याची छाप जसप्रीत बुमराह याने विकेट घेतल्यावर दिसून आली. मॅनचेस्टर युनायटेडचा स्ट्राइकर मार्कस रॅशफोर्ड प्रमाणे त्याने सेलिब्रेशन केलं. अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज इब्राहिम जारदान याला बाद केल्यानंतर त्याने कपाळावर बोट ठेवलं आणि स्क्रू डायव्हरसारखं फिरवलं. यानंतर सोशल मीडियावर या ॲक्शनची चर्चा रंगली. यावर आता जसप्रीत बुमराह याने उत्तर दिलं आहे.
‘हे काय मॅनचेस्टर युनाइटेडचा स्ट्रायकर मार्कस रॅशफोर्ड याला ट्रिब्यूट नव्हतं. मी तसं केलं त्याचं काही कारण नाही. मला वाटलं तरं मी केलं.’, असं जसप्रीत बुमराह याने सांगितलं. दुसरीकडे आईला भेटण्याचं कारणही सांगितलं. “मी तिला भेटायला जाणार आहे. मी काही दिवसांपासून बाहेर आहे. माझ्या आईला घरी पाहून आनंद होईल.” जसप्रीत बुमराह याची आई दलजीत एक स्कूल प्रिंसिपल आहे. जसप्रीत पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात जसप्रीत बुमराह याने जबरदस्त स्पेल टाकला. पहिल्या सामन्यात 2, तर दुसऱ्या सामन्यात 4 गडी बाद केले. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात 41 चेंडू निर्धाव टाकले. त्याची आता जोरदार चर्चा रंगली. भारताचा पुढचा सामना पाकिस्तानसोबत 14 ऑक्टोबरला होणार आहे.