मुंबई : रोहित शर्माने 14 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टी20 फॉर्मेटमध्ये कमबॅक केलं. त्याच्याकडे टी20 वर्ल्डकप संघाची धुरा देण्याच्या उद्देशाने हे कमबॅक झालं आहे. पण रोहित शर्माची कामगिरी पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक राहिली. पहिल्या सामन्यात शुबमन गिलसोबत संवाद तुटल्याने रनआऊट झाला. तर दुसऱ्या सामन्यात शून्यावर क्लिन बोल्ड होत तंबूत परतला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा तसंच काहीसं झालं तर टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. यासाठी रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात सावधपणे खेळत होता. पण सुरुवातीला काही चेंडू निर्धाव गेल्यानंतर त्याची चिंता रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. त्याने याबाबतचं दु:ख पंचांना हसत खेळत बोलून दाखवलं. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार आला. पण पंचांनी लेग बाय दिला. ही बाब रोहितच्या लक्षात आली तेव्हा त्याने पंचांशी संवाद साधला आणि ही सर्व बाब स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली.
कर्णधार रोहित शर्माने पंच वीरेंद्र शर्माशी संवाद साधत सांगितलं की, “अरे वीरू, पहिला लागला तो थाय पॅड होता का. इतकी मोठी बॅट लागली. एकतर इकडे 2-0 झाले आहेत. ” रोहित शर्मा सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्याची ही सळ होती. लेग बाय दिल्याने रोहितच्या खात्यात एकही धाव तेव्हा नव्हती. रोहित सुरुवातीला एक एक धाव घेण्यासाठी धडपड करत होता. त्यात 22 धावांवर 4 गडी बाद झाल्याने दडपण होतं ते वेगळं. अखेर रोहित शर्माला सूर गवसला आणि त्याला रिंकू सिंहची साथ लाभली.
Rohit to umpire saying pehle hi 2 zero ho gaya hai 🤣 pic.twitter.com/ElWlQWkOuz
— Kohlisthetic (@TheKohlisthetic) January 17, 2024
रोहित शर्माने 69 चेंडूत नाबाद 121 धावा केल्या. या खेळीत 11 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. तर रिंकू सिंहने 39 चेंडूत 69 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह या जोडीने 190 धावांची भागिदारी केली. तसेच अफगाणिस्तानसमोर 212 धावा करत विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानच्या संघाने चिवट झुंज दिली आणि 6 गडी गमवून 212 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.