IND vs AFG : संजू सॅमसनची शेवटची संधी हुकली, तिसऱ्या सामन्यात नको तेच झालं अन् वर्ल्डकपचं तिकीट कट!
क्रिकेटमध्ये कशाचीही पर्वा न करता आक्रमक शैली असलेल्या संजू सॅमसनची कायमच चर्चा होत असते. कधी संघात तर कधी बाहेर अशी स्थिती. त्यामुळे त्याच्या निवडीबाबत कायमच चर्चा असते. टी20 वर्ल्डकपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. पण या सामन्यात नको तेच झालं.
मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या झालेल्या दोन टी20 सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने अपेक्षेप्रमाणे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव यांना संधी मिळाली. संजू सॅमसनला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचं सोनं करणं आवश्यक होतं. पण संजू सॅमसनचं नशिब या सामन्यात फुटकं निघालं. त्यामुळे टी20 वर्ल्डकपमध्ये न निवडण्याचं आणखी कारण मिळालं. तिसऱ्या टी20 सामन्यात तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर संजू सॅमसनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण पहिल्या चेंडूवरच बेधडकपणे फटका मारण्याच्या नादात विकेट देऊन बसला. संजूच्या या स्वभावाचा त्याला फटका बसला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून खेळणं त्याला जमलं नाही. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
संघाच्या 18 धावा असताना यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली आला त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. शिवम दुबेने खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पाच चेंडू व्यवस्थित खेळला पण सहाव्या चेंडूवर तंबूत परतावं लागलं. 21 धावांवर 3 गडी बाद झाले होते. त्यामुळे संजू सॅमसनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण संजू सॅमसन आला आणि हजेरी लावून गेला. गोल्डन डकवर बाद झाला. आता संजू सॅमसनला आयपीएल 2024 स्पर्धेतच काय ते सिद्ध करावं लागेल. अन्यथा टी20 वर्ल्डकपचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे.
अफगाणिस्तानकडून फरीद अहमद मलिक याने 3 गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीमुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. 200 हून अधिक धावा होतील अशी खेळपट्टी असताना भारतीय फलंदाज एका एका धावेसाठी झुंजताना दिसले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.