IND vs AFG T20 : रनआऊट झाल्यानंतर शुबमन गिलवर का भडकला? रोहित शर्माने सामन्यानंतर सर्वकाही सांगून टाकलं
अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी20 सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. पण दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा धावचीत झाल्याने वातावरण तापलं होतं. इतकंच काय तर रोहित शर्माने भर मैदानात शुबमन गिलला सुनावल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. त्यावर सामन्यानंतर रोहित शर्माने स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. 14 महिन्यांच्या कालावधीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली होती. टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर हा पहिलाच टी20 सामना होता. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 20 षटकात पाच गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 17.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात एक प्रसंग असा आला की कर्णधार रोहित शर्मा तापलेला दिसला. विजयी लक्ष्य गाठण्यासाठी रोहित आणि गिल जोडी मैदानात उतरली होती.पण दुसऱ्याच चेंडुवर रोहित शर्माला धावचीत होत तंबूत परतावं लागलं. टी20 क्रिकेटमध्ये धावचीत होण्याची रोहितची ही सहावी वेळ होती. 14 महिन्यांनी कमबॅक आणि टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने परफॉर्मन्स अशा दुहेरी कात्रीत रोहित अडकला असताना धावचीत झाल्याने चांगलाच संतापला. त्याने मैदानातच शुबमन गिलवर संताप व्यक्त केला.
सामन्यातील विजयानंतर रोहित शर्माला या प्रसंगाबाबत विचारलं गेलं. धावचीत झाला आणि शुबमन गिलवर संतापला होता, नेमकं काय झालं होतं. हा प्रश्न विचारताच रोहित शर्मा पहिल्यांदा हसला आणि उत्तर देत म्हणाला की, “या गोष्टी घडत असतात. मला संघासाठी धावा करायच्या होत्या तिथे आऊट झालं की असं होतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारख्या घडतात असं नाही. मला वाटतं गिलने आता यातून पुढे जायला हवं.”
रोहित शर्माने 14 महिन्यानंतर कमबॅक केलं होतं. त्यामुळे त्याच्याकडून क्रीडारसिकांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. अवघ्या दोन चेंडूंचा सामना करत तंबूत परतला. रोहित शर्माकडे टी20 वर्ल्डकपचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता दोन आंतरराष्ट्रीय आणि 14 आयपीएल सामने आहेत. यातच त्याला सिद्ध करून दाखवावं लागेल.
दुसरीकडे, शिवम दुबेने नाबाद 60 धावांची खेळी केली. संघाला गरज होती तेव्हाच त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. यामुळे रोहित शर्माही खूश दिसला. सामन्यानंतर शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांचं कौतुक केलं. आता पुढचा टी20 सामना 14 जानेवारीला होणार आहे.