IND vs AUS, 1st Odi | केएल राहुल याची झुंजार खेळी, टीम इंडियाची विजयी सलामी
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयी आव्हानचं पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या दोघांनी कारनामा केला.
मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनीच ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलंल. दरम्यान टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
टीम इंडियाकडून केएल राहुल याने सर्वाधिक 91 बॉलमध्ये नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्स खेचला. तर रविंद्र जडेजा याने 69 बॉलमध्ये 5 चौकारांसह नॉट आऊट 45 रन्स केल्या. त्याशिवाय कॅप्टन हार्दिक पंड्याने याने 25 आणि शुबमन गिल याने 20 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने 3 आणि मार्क्स स्टोयनिसने 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाची विजयी सुरुवात
#TeamIndia go 1⃣-0⃣ up in the series! ? ?
An unbeaten 1⃣0⃣8⃣-run partnership between @klrahul & @imjadeja as India sealed a 5⃣-wicket win over Australia in the first #INDvAUS ODI ? ?
Scorecard ▶️ https://t.co/BAvv2E8K6h @mastercardindia pic.twitter.com/hq0WsRbOoC
— BCCI (@BCCI) March 17, 2023
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच पहिला झटका दिला. ट्रॅव्हिस हेड याला मोहम्मद सिराज याने बोल्ड केलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकुदुखी ठरत होती. तेवढ्यात कॅप्टन हार्दिक पंड्याने याने स्टीव्हनचा काटा काढला. सेट झालेला स्टीव्हन 22 रन्स करुन माघारी परतला.
यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. तिसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्श याने लाबुशेनसह 52 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र मिचेल याला रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. मार्शने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मिचेल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 3 बाद 129 अशी स्थिती झाली होती.
मार्शनंतर जोश इंग्लिस मैदानात आला. जोश आणि मार्नल लाबुशेन हे डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 10 धावा जोडल्या. मात्र यानंतर रविंद्र जडेजा याने कुलदीप यादव याच्या बॉलिंगवर शानदार कॅच घेत मार्नस लाबुशेन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लाबुशेन याने 15 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 4 बाद 139 अशी स्थिती झाली. एकावेळी मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बॅकफूटवर ढकललं.
त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी मुसंडी मारत कांगारुंना मैदानात टिकूच दिलं नाही. एका बाजूने शमी आणि सिराज कांगारुंना रडवत होते. तर दुसऱ्या बाजूने रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडीही चांगली बॉलिंग टाकत होते.
चौथ्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. कांगारुंनी शेवटच्या 6 विकेट्स या 49 धावांच्या मोबदल्यात तर शेवटच्या 4 विकेट्स या 4 धावांच्या आतच गमावल्या. शमी आणि सिराज या दोघांव्यतिरिक्त रविंद्र जडेजा याने 2, कुलदीप यादव याने 1 आणि कॅप्टन हार्दिक याने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.