IND vs AUS | टीम इंडियाचा इंदूरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे क्रिकेटमध्ये 3 हजार सिक्स ठोकण्याचा कीर्तीमान
india vs australia 2nd odi match world record | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने योगदान दिलं. टीम इंडियाने या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
इंदूर | टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडून काढला. ऋतुराज गायकवाड याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फटकेबाजी केली. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनी वैयक्तिक शतकं लगावली. तर कॅप्टन केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी विस्फोटक अर्धशतकी खेळी केली. तसेच ईशान किशन आणि रवींद्र जडेजा या दोघांनीही चांगली साथ दिली.
टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड याने 8 धावांची खेळी केली. शुबमन गिल याने 97 बॉलमध्ये 104 धावा केल्या. श्रेयस अय्यर याने 90 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी केली. कॅप्टन केएल राहुल याने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. ईशान किशन याने 31 धावांचं योगदान दिलं. तर सूर्यकुमार यादव याने अखेरच्या काही षटकात कांगारुंची धुलाई केली. सूर्यकुमार याने 37 बॉलमध्ये नाबाद 72 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा याने नॉट आऊट 13 रन्स केल्या.या जोरावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 399 धावा केल्या. टीम इंडियाने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड
टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टीम इंडिया वनडेत 3 हजार सिक्स लगावणारी पहिली टीम ठरली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाकडून एकूण 18 सिक्स लगावण्यात आले. यासह टीम इंडियाच्या नावावर एकूण 3 हजार 7 सिक्स नोंद झाली आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी विंडिज आहे. विंडिजच्या नावावर 2 हजार 953 सिक्स आहेत. तर तिसऱ्या स्थानी 2 हजार 566 सिक्ससह पाकिस्तान विराजमान आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.