नवी दिल्ली | टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन आणि उपकर्णधार केएल राहुल याला गेल्या काही सामन्यांपासून धावांसाठी झगडावं लागत आहे. केएल आऊट ऑफ फॉर्म असल्याने त्याला टीका सहन करावी लागतेय. मात्र अचानक केएल राहुल याचं सोशल मीडियावर अचानक कौतुक होऊ लागलं आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात केएल याने ऑस्ट्रेलियाच्या सेट फलंदाजाचा हवेत उडी घेत थरारक कॅच घेतला आहे.
केएलने ऑस्ट्रेलियाचा सेट फलंदाज उस्मान ख्वाजा याचा अप्रतिम कॅच घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एका बाजूला कांगारुंना झटपट आऊट केलं. मात्र दुसऱ्या बाजूला उस्मान ख्वाजा घट्ट पाय रोवून उभा होता. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. पण रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर उस्मानचा काटा काढलाच, पण उस्मानचा काटा काढण्यात केएलचं मोठं योगदान राहिलं.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 46 वी ओव्हर रविंद्र जडेजा टाकायला आला. जडेजाच्या बॉलिंगवर उस्मानने रिव्हर्स स्वीप मारला. केएल एक्सट्रा कव्हर्सवर उभा होता. उस्मानने मारलेला फटका केएलपासून थोडा दूर होता. मात्र केएलने कमालीची स्फुर्ती दाखवत आधी धावला, बॉलवर लक्ष केंद्रीत केलं आणि हवेत अफलातून उडी घेत एका हाताने कडक कॅच घेतली. केएलने घेतलेला कॅच पाहून उस्मानही काही क्षण पाहतच राहिला.
केएल राहुल याने घेतलेला कॅच
ICYMI – WHAT. A. CATCH ??
WOW. A one-handed stunner from @klrahul to end Usman Khawaja’s enterprising stay!#INDvAUS pic.twitter.com/ODnHQ2BPIK
— BCCI (@BCCI) February 17, 2023
उस्मानने 125 बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली. केएलने घेतलेल्या कॅचमुळे उस्मानची शतक करण्याची संधी हुकली. उस्मानने 81 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
दरम्यान टीम इंडियाचा ‘द वॉल 2’ चेतेश्वर पुजारा याच्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा दुसरा कसोटी सामना अत्यंत खास आहे. पुजारा याच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा सामना आहे. या 100 व्या सामन्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. तेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंनी चेतेश्वर पुजारा याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.