IND vs AUS 2ODI : मिचेल स्टार्क याने भारताच्या भूमीत ‘ती’ कामगिरी करून दाखवलीच
कांगारूंच्या खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मिचेल स्टार्कने 5 विकेट्स घेत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. भारतामध्ये असा विक्रम त्याने पहिल्यांदाच केलाय.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये भारतावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव कांंगारूंनी अवघ्या 117 धावांवर गुंडाळला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर 11 षटकांच्या आतच हे आव्हान पूर्ण केलं. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना दोन्ही संघासाठी करो वा मरो असा असणार आहे. कांगारूंच्या खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मिचेल स्टार्कने 5 विकेट्स घेत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
स्टार्कने भारताचा कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना बाद केलं. या कामगिरीसह स्टार्कने भारतीय भूमीत पहिल्यांदाच 5 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. इतंकच नाहीतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टार्कने 9 वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज बनला आहे.
दुसऱ्या स्थानी आता माजी गोलंदाज ब्रेट ली असून त्याने 217 डावांमध्ये 9 वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या तर स्टार्कने फक्त 109 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तिसऱ्या स्थानी ग्लेन मॅकग्रा असून त्यांनी 247 डावात 7 वेळा पाच विकेट्स किंवा त्यापेक्षा घेतल्या आहेत.
दरम्यान, भारताच्या 117 धावसंख्येमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर अक्षर पटेल याने नाबाद 29 धावा केल्या. ऑस्ट्रेलयाकडून मिचेल स्टार्कने 5, सेन एबॉट 3 आणि नाथन एलिसने 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.