IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ एकटा खेळाडू टीम इंडियाला पडला भारी, सामना गमवायची आली वेळ!
भारतीय संघ बॅटींगला उतरल्यावर सुरूवातही एकदम झकास झाली होती. मग माशी नेमकी शिंकली कुठं?, संपूर्ण सामना पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कांगारूंच्या एका खेळाडूने सामना फिरवला.
मुंबई : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यामध्ये 21 धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये भारताचा पराभव होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला 269 धावांच्या आतमध्ये रोखलं होतं. भारतीय संघ बॅटींगला उतरल्यावर सुरूवातही एकदम झकास झाली होती. मग माशी नेमकी शिंकली कुठं?, संपूर्ण सामना पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कांगारूंच्या एका खेळाडूने सामना फिरवला. नेमका कोण आहे तो खेळाडू ज्यामुळे भारताला मालिका गमवावी लागली? जाणून घ्या.
भारताचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरूवात केली होती. खास करून गिलने तर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या मिचेल स्टार्कला सलग दोन कडक चौकार मारले. त्यानंतर दोघांनी आपला दांडपट्टा चालू ठेवला होता, संघाला अर्धशतक पार करून दिलं. मात्र रोहित ट्रॅप लावल्याप्रमाणे कांगारूंच्या जाळ्यात अडकला. अगदी खेळाडूला हातात झेल देत आपली विकेट त्याने बहाल केली.
विराट मैदानात आला आणि त्याने शुबमनसोबत भागीदार रचायला सुरूवात केली. तेव्हा तोच ज्याने एकट्याने भारताला हरवलं तो अॅडम झॅम्पा शुबमनला बाद करत संघाला दुसरं यश मिळवून देतो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी के. एल. राहुल येतो.
विराट कोहली आणि के. एल. दोघांची भागीदारी होते, काहीवेळ असं वाटतं सामना कांगारूंच्या हातातून गेला आहे. मात्र तेव्हाही राहुलला आपल्या गुगलीच्या जाळ्यात अडकवून त्याला माघारी पाठवतो. त्यानंतर अक्षर धावबाद होतो. सामन्याची 15 षटके बाकी असतात आणि त्यावेळी विराटला अॅश्टन आगर बाद करतो, फक्त त्यालाच नाहीतर त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही तो बाद करतो.
भारतीय संघाला बसलेले हे धक्के काही पचवता आले नाहीत , त्यानंतर जडेजा आणि पांड्या यांनी सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना काही सामना जिंकून देता आला नाही. दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना मोक्याच्या क्षणी त्याने माघारी धाडलं. त्यावेळी कांगारूंच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब झालं.