Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा याला इंदूर कसोटीतील ती चूक महागात
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.
इंदूर | टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत शानदार विजय मिळवला. सलग 2 विजयानंतर चाहत्यांना टीम इंडियाकडून इंदूर कसोटीतही धमाकेदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंदूर कसोटीतील पहिल्या इनिंगमध्ये सपशेल निराशा केली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारुंच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्कारली. कॅप्टन रोहित शर्मा स्वसतात आऊट झाला. यासह रोहितच्या नावावर नकोशा रेकॉर्ड झाला आहे. यामुळे रोहितच्या कसोटी कारकीर्दीला डाग लागला आहे.
नक्की काय झालं?
रोहित तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात स्टंपिग आऊट झाला. रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. रोहित सामन्याच्या 6 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आऊट झाला. मॅथ्यू कुह्नमॅन हा टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमधील 6 वी ओव्हर टाकत होता.
रोहितने या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर पुढे येत फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल टर्न झाल्याने बॅटला स्पर्श झाला नाही. रोहितकडून हुकलेला बॉल विकेटकीपर एलेक्स कॅरीने न चूकता कलेक्ट केला आणि रोहितला स्टपिंग केलं. रोहित 23 बॉलमध्ये 12 धावा करुन माघारी परतला.
रोहित यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफीत स्टंपिंग आऊट होणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. तसेच सर्वाधिक वेळा स्टंपिग होणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहित शर्मा याचा समावेश झाला.
रोहित शर्माची स्टंपिग आउट होण्याची ही एकूण 10 वी वेळ ठरली आहे. रोहित यासह सर्वाधिक वेळा स्टपिंग होण्याच्या बाबतीत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तसेच रोहितने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याची बरोबरी केली आहे.
तर सर्वाधिक वेळा स्टंपिंग आऊट होण्याचा रेकॉर्ड हा टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावावर आहे.
टीम इंडियाचा पहिला डाव
टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या डावात पूर्णपणे अपयशी ठरले. टीम इंडिया पहिल्या डावात 33.2 ओव्हरमध्ये 109 धावांवर ऑलआऊट झाली.
टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 22 धावा केल्या. ओपनर शुबमन गिल याने 21 धावांचं योगदान दिलं. उमेश यादव आणि श्रीकर भरत या दोघांनी प्रत्येकी 17 धावा जोडल्या. कॅप्टन रोहित शर्मा 12 धावांवर मोठा फटका मारण्याच्या नादात स्टंपिग आऊट झाला.
अक्षर पटेल 12 धावांवर नाबाद परतला. तर रविंद्र जडेजा 4, आर अश्विन याने 3 तर चेतेश्वर पुजारा याने 1 धाव केली. तर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुह्नमॅन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. नॅथन लायनने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मर्फीने 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसअखेर आघाडीवर
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 47 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलिया 109 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात आली. ऑस्ट्रेलियाला 12 धावांवर पहिला झटका लागला. ट्रेव्हिस हेड 9 धावा करुन माघारी परतला.
त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. ही सेट जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. मात्र रविंद्र जडेजा याने लाबुशेनला आऊट करत ही जोडी फोडली.
लाबुशेन 91 बॉलमध्ये 31 धावा केल्या. त्यानंतर जडेजाने ऑस्ट्रेलियाला आणखी 2 धक्के दिले. जडेजाने उस्मान ख्वाजा आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याला आऊट केलं. ख्वाजाने 60 तर स्मिथने 26 रन्स केल्या.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 47 धावांची आघाडी घेतली आहे. पीटर हँड्सकॉम्ब आणि कॅमरुन ग्रीन ही जोडी नॉट आऊट आहे. तर रविंद्र जडेजाने याने एकट्यानेच 4 विकेट घेतले.
आता दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.
स्कोअरकार्ड
ऑस्ट्रेलिया (1st Ing) – 156-4 (54 Ov)
टीम इंडिया (1st Ing) – 109-10 (33.2 Ov)
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेने, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमॅन.