INDvsAUS | विराट कोहली याचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मोठा कारनामा
टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी बॅट्समन विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत मैदानात उतरताच मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौथा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने मैदानात उतरताच मोठा रेकॉर्ड केला आहे. विराटचा हा त्याच्या कसोटी कारकीर्दीतील भारतातला 50 वा सामना आहे. विराट अशी कामगिरी करणारा एकूण 8 वा भारतीय ठरला आहे. तर धावांच्या बाबतीत विराट चौथ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडिया फिल्डिंगसाठी मैदानात आली. विराट मैदानात येताच टीम इंडियाकडून भारतात 50 वा कसोटी सामना खेळणारा आठवा खेळाडू ठरला. विराटने यासह मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं. आतापर्यंत टीम इंडियाकडून भारतात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग, चेतेश्वर पुजारा, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि दिलीप वेंगसकर यांनी ही कामगिरी केली आहे.
विराटने आतापर्यंत भारतात खेळलेल्या 49 कसोटी सामन्यांमध्ये 3 हजार 958 धावा केल्या आहेत. विराटने या धावा 58.21 च्या सरासरीने केल्या आहेत. यामध्ये 13 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट खेळीची प्रतिक्षा
विराट कोहली याच्याकडून टीम इंडिया आणि चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराटला गेल्या 13 महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकही ठोकता आलेलं नाही. त्यामुळे विराटकडून धमाकेदार खेळी करत ही प्रतिक्षा संपवावी, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांची आहे.
टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर
दरम्यान टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने नागपूर आणि त्यानंतर दिल्ली या पहिल्या 2 सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. मात्र त्यानंतर इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना हा खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा हा चौथ्या सामन्यासह मालिका जिंकण्याचा आणि wtc final चं तिकीट नक्की करण्याचा प्रयत्न आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलियाचे शिलेदार | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.