फॉलोऑनचं संकट टळलं! नितीश कुमार रेड्डीने डाव उधळला, वॉशिंग्टन सुंदरची मिळाली साथ
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाची पकड आहे. यात काही शंका नाही. पहिल्या डावात 474 धावा करून त्यांनी भारतावर दबाव आणला. त्यामुळे भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल असं वाटत होतं. पण नितीशच्या खेळीमुळे हे संकट टळलं.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत आला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 474 धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल वगळता इतर खेळाडू फेल गेले होते. त्यामुळे संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत भारताने निदान फॉलोऑनची नामुष्की तरी टाळावी असं क्रीडाप्रेमींना वाटत होतं. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी भ्रमनिरास केला. ऋषभ 28, तर रवींद्र जडेजा 17 धावा करून बाद झाले. पण तळाशी असलेल्या नितीश कुमार रेड्डीने तग धरून ठेवला होता. टीम इंडियाला संकटातून काढण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आलं. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 275 धावांची गरज होती. आठव्या विकेटसाठी या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघावरील फॉलोऑनचं संकट दूर केलं. नितीश कुमार रेड्डीने 82 चेंडूत 51 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 1 षटकार मारला.
नितीश कुमार रेड्डीला आठव्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळाली. कारण त्याचाही फॉलोऑन टाळण्यात मोलाचा वाटा राहिला. कारण एका बाजूने विकेट सांभाळून खेळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं होतं. आता भारतीय संघ पुढे किती धावा करणार त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. दरम्यान, या दोघांच्या झुंजार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचं टेन्शन मात्र वाढलं आहे. कारण आता दोन दिवसांचा शिल्लक आहे. तसेच किती धावांची आघाडी मिळेल आणि किती धावा जिंकण्यासाठी द्यायचा हा देखील प्रश्न आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप