Video : सिराजच्या गोलंदाजीवर विराटने काढली स्मिथची विकेट, चेंडू टाकण्यापूर्वीच दिला होता मंत्र
बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचं चित्र चौथ्या दिवशी पालटलं. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचं सहज जिंकण्याचं स्वप्न भंगलं. तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. जसप्रीत बुमराह आणि सिराजने कंबरडं मोडलं. पण स्टीव्ह स्मिथची विकेट घेण्यात विराटचा खास प्लान होता.
बॉक्सिंग डे कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर होणार आहे. चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे पहिल्या डावात 474 धावा केल्या. तर भारताने प्रत्युत्तरात 369 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन फलंदाजीची पिसं काढली. पहिल्या डावात सिराजला विकेट मिळाली नव्हती. पण दुसऱ्या डावात जबरदस्त कमबॅक केलं. स्टीव्ह स्मिथ या मालिकेत फॉर्मात आहेत. सलग दोन डावात सेंच्युरी ठोकत फॉर्म दाखवून दिला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात त्याची विकेट मिळणं महत्त्वाचं होतं. यासाठी विराट कोहलीने खास प्लान आखला होता. हा प्लान यशस्वी ठरला आणि स्टीव्ह स्मिथचा डाव 13 धावांवर आटोपला.
मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट पडल्या होत्या. तसेच समोर स्मिथ फलंदाजी करत होता. मोहम्मद सिराज चेंडू टाकण्यासाठी धाव घेणार तितक्यात विराट कोहली ओरडला की कोपऱ्यातून टाक. प्लानप्रमाणे सिराजने तसंच केलं आणि स्मिथ विकेट देऊन बसला. त्याच्या बॅटचा कोपरा लागून चेंडू थेट विकेटकीपर ऋषभ पंतच्या हाती गेला.
SIRAJ 🤝 KOHLI….!!!!
– Smith gone & game opened for India at MCG. pic.twitter.com/W1UcNaCWuv
— Johns. (@CricCrazyJohns) December 29, 2024
‘कोपऱ्यातून कोपऱ्यातून.. प्रत्येक चेंडू कोपऱ्यातून.. त्याला कोपऱ्यातून आवडतं.’, असं विराट कोहली म्हणाला. तेव्हा या विकेटचं विश्लेषण करताना समालोचक म्हणाले की, जेव्हा गोलंदाज क्रिझच्या कोपऱ्यातून चेंडू टाकतो, तेव्हा फलंदाजाच्या डोक्यात येतं की हा चेंडू आत टाकेल. पण त्याने क्रिझच्या कोपऱ्यात जाऊन बाहेर चेंडू टाकला. या चेंडूचा सामना करताना स्टीव्ह स्मिथ फसला आणि विकेट देऊन बसला. दरम्यान, भारत ऑस्ट्रेलिया सामना चौथ्या दिवशी वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. फलंदाजांनी आपलं कर्तव्य बऱ्यापैकी बजावलं आहे. आता भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.