AUS vs IND : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ सामना, मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान
India vs Australia 5th Test : टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करायची असेल तर पाचव्या आणि अंतिम सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे अन्यथा मालिका गेलीच समजा.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना हा 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरुवात होणार आहे. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा पाचव्या सामन्यात खेळणार नसल्याचं खरं ठरल्यास जसप्रीत बुमराह कर्णधारपदाच्या भूमिकेत असेल. टीम इंडियासाठी हा सामना अनेक दृष्टीने महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा आहे.
टीम इंडियासाठी ‘आर या पार’ची लढाई
टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला ही मालिका गमवायची नसेल तर कोणत्याही स्थितीत पाचव्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच या सामन्याच्या निकालावरच टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची सर्व समीकरणं अवलंबून आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालावर सर्व काही अवलंबून असणार आहे.
सिडनीतील आकडेवारी चिंताजनक
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत सिडनीत एकूण 13 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाला 13 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा भारताला पराभूत केलं आहे. तर 7 सामने हे बरोबरीत राहिले आहेत. टीम इंडियाने सिडनीत 1978 साली बिशनसिंह बेदी यांच्या नेतृत्वात अखेरचा कसोटी सामना जिंकला होता. त्यामुळे टीम इंडिया 46 वर्षांनंतर पुन्हा विजय मिळवणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.