Team India | टीम इंडियात बदलाचे वारे, चेतेश्वर पुजारा याचा पत्ता कट! पुढचा नंबर कुणाचा?
Bcci On Cheteshwar Pujara | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील फ्लॉप कामगिरीचा फटका चेतेश्वर पुजारा याला बसण्याची शक्यता आहे. पुजाराला विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात येऊ शकतं.
मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवाचा परिणाम हा आगामी मालिकांमध्ये होताना दिसणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वेस्टइंडिड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विंडिज दौऱ्यावर कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. तसेच टी 20 मालिकेसह, एकदिवसीय आणि टेस्ट सीरिजमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. टीम इंडियातील बदलला चेतेश्वर पुजारा याच्यापासून सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे.
टीम इंडियाला 2021 मध्ये न्यूझीलंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता 2 वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर पुन्हा भारतीय संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. टीम इंडियातील खेळाडू हे आयपीएल 16 व्या मोसमात खेळत होते. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करत होता.
पुजारा कॅप्टन्सीसह बॅट्समनचीही भूमिका शानदार पद्धतीने पार पाडत होता. द्विशतक, शतक ठोकल्याने बीसीसीआयही आनंदी होती. पुजाराकडून wtc final पार्श्वभूमीवर अशी कामगिरी टीम इंडियाला सुखावणारी होती. मात्र पुजारा ऐन सामन्यात सपशेल अपयशी ठरला. पुजाराने घोर निराशा केली. त्यामुळे आता आगामी विंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड समिती पुजाराची दांडी गुल करु शकते.
टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या निमित्ताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया विडिंज दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने 12 जुलैपासून होतेय. ही एकूण 2 सामन्यांच्या कसोटी मालिका असणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर होण्यासाठी अजून बराच वेळ आहे. मात्र सूत्रांनुसार, निवड समिती आणि टीम मॅनेजमेंट एकाचवेळी अनेक बदल करणार नाही. मात्र चेतेश्वर पुजारा याला संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
पुजाराची निराशाजनक कामगिरी
पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यात सपशेल निराशा केली. पुजाराने याआधी टीम इंडियाला अनेकदा सामने जिंकून दिले आहेत. त्याच्याकडे राहुल द्रविड याचा वारसदार म्हणून पाहिलं जातं. मात्र पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 14 आणि 27 अशा धावा केल्या. त्यामुळे आता पुजाराचं भवितव्य पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.