IND vs AUS | विराट-केएल जोडीचा कांगारुंना तडाखा, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय
Icc World Cup 2023 India vs Australia Match Result | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मोहिमेची सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कांगारुंचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.
चेन्नई | केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 41.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. केएल राहुल याने सिक्स ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएल आणि विराट हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच ऑस्ट्रेलियाचा 1992 नंतर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात पराभव झाला.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाची 200 धावांचा पाठलाग करताना अतिशय वाईट सुरुवात झाली. ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तिघे भोपळा न फोडता आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 3 बाद 2 अशी स्थिती झाली. मात्र तिथून विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. सिंगल-डबल घेत टीम इंडियाचा स्कोअर कार्ड हलता ठेवला. त्यानंतर टीम इंडियाच्या या जोडीने गिअर बदलत फटकेबाजीला सुरुवात केली.
दोघांनी संधी मिळाली तेव्हा मोठे फटके मारले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चौफेर फटके मारले. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावलं. त्यामुळे टीम इंडिया सेफ झोनमध्ये आली. त्यानंतर पुढे या दोघांनी फटकेबाजी सुरुच ठेवली. ही जोडीच टीम इंडियाला विजय मिळवून देणार असच वाटत होतं. मात्र तेवढ्यात जोश हेझलवूड याने विराट कोहली याने मार्नस लबुशेन याच्या हाती कॅच आऊट केलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमधील विक्रमी 165 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 85 धावांवर आऊट झाला. विराटने 116 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. मात्र सामना संपवता न आल्याने विराट स्वत:वरच नाराज दिसला.
विराट आऊट झाल्यानंतर उपकर्णधार हार्दिक पंड्या मैदानात आला. हार्दिकनेही मोठा फटका मारत मॅच संपवण्याची तयारी दाखवली. मात्र दुसऱ्या बाजूला पेटलेल्या केएल राहुल याने सिक्स खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएल राहुल याला दुर्देवाने शतक पूर्ण करता आलं नाही. केएल राहुल 97 धावांवर नाबाद राहिला. केएल याने 115 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 फोरसह या धावा केल्या. तर हार्दिकने नॉट आऊट 11 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क याने एकमेव विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं 199 धावांवर पॅकअप केलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने 46 आणि डेव्हिड वॉर्नर याने 41 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेन याने 27 आणि अखेरच्या क्षणी मिचेल स्टार्क याने 28 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना टीम इंडियाच्या गोलंदाजांना हात खोलण्यापासून रोखलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.
चेन्नईतला हिशोब चुकता
दरम्यान टीम इंडियाने या विजयासह चेन्नईतील ऑस्ट्रेलियाचा 36 वर्षांचा हिशोब चुकता केला. या आधी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये चेन्नईत आमनेसामने होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 1 धावेने रोमहर्षक विजय मिळवला होता. मात्र आता 36 वर्षांनी टीम इंडियाने या पराभवाचा हिशोब पूर्ण केलाय.
टीम इंडियाची विजयी सुरुवात
An incredible 97* in the chase when the going got tough 👏👏
KL Rahul receives the Player of the Match award as #TeamIndia start #CWC23 with a 6-wicket win 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rY7RfHM1Bf
— BCCI (@BCCI) October 8, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.