मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. या पहिल्या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलंय. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत चौथ्यांदा पराभूत केलंय. मात्र वनडे सीरिजमध्ये उभय संघातील आकडेवारी कोणाच्या बाजूने आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. वनडेमध्ये टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया या दोघांपैकी एकमेकांवर आतापर्यंत कोण वरचढ ठरलंय हे आकडेवारीतून पाहणार आहोत.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 143 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 143 पैकी 80 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 53 वेळा ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. तर 10 सामन्यांचा काही निकाल लागला नाही.
दोन्ही संघ आतापर्यंत वानखेडेवर एकूण 4 वनडे सामन्यात भिडले आहेत. इथेही कांगारु वरचढ ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 3 वेळा विजय मिळवलाय. तर टीम इंडियाला फक्त एकदाच कांगारुना पराभूत करता आलं आहे. आकडेवारी जरी कांगारुंच्या बाजूने असली तरी गेल्या काही वर्षांची कामगिरी पाहता टीम इंडियाचा बोलबाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्सऐवजी स्टीव्ह स्मिथ करणार आहे. पॅटच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळणार नाही. तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. यामुळे हार्दिक पंड्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.