IND vs AUS | टीम इंडियासाठी वाईट बातमी, स्टार बॅट्समन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमधून ‘आऊट’
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेनंतर 3 मॅचची वनडे सीरिज होणार आहे. मुंबईतून या एकदिवसीय मालिकेची सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी आली आहे.
मुंबई | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. सामना अनिर्णित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानंतर उभय संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या सीरिजला 17 मार्चपासून मुंबईतून सुरुवात होत आहे. त्याआधी टीम इंडियासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर याच्या जुन्या दुखापतीने नव्याने डोकं वर काढलंय. श्रेयसला लोअर बॅक इंजरीचा त्रास सतावतोय. या दुखापतीमुळे श्रेयसला चौथ्या सामन्यात बॅटिंगसाठीही येता आलं नाही. आता श्रेयस चौथ्या सामन्यातूनही बाहेर पडलाय. त्यामुळे श्रेयसची दुखापत किती गंभीर आहे, याचा अंदाज बांधता येईल.
श्रेयसला याच दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या नागपूर कसोटीतही खेळता आलं नव्हतं. मात्र त्याने दुसर्या टेस्टमधून कमबॅक केलं होतं. मात्र त्या दुखापतीने पुन्हा श्रेयसला अडचणीत आणलंय. तसेच आता या दुखापतीमुळे श्रेयसला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेलाही मुकावं लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच वनडे सीरिजनंतर आयपीएल स्पर्धेच्या 16 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे श्रेयस दुखापतीतून लवकर सावरला नाही, तर टीम इंडियासह कोलकाता टीमसाठीही हा मोठा झटका असेल.
पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या कॅप्टन
दरम्यान वनडे सीरिजमधील पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात वैयक्तिक कारणामुळे रोहित शर्मा खेळणार नाही. त्यामुळे या सलामीच्या सामन्यात हार्दिक पंड्या कॅप्टन्सी करणार आहे.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.