IND vs AUS : शतकी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला कोणत्या स्थानावर खेळायचंय? स्वत:च खुलासा करत सांगितलं की…
Ind vs Aus 2nd ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरला सूर गवसला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर अय्यरने शतकी खेळी केली. पण ज्या स्थानावर खेळायला उतरला त्या जागी विराट कोहली खेळतो.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी गेल्या वर्षभरात टीम इंडियाने अनेक प्रयोग केले. मात्र काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे सर्वच कोलमडलेलं दिसून आलं. अनेकदा प्रयोग फसलेही. त्यामुळे केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरण्याची वाट पाहात होते. वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी या तिन्ही खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. तसेच टीम इंडियाची ताकद वाढल्याचं दिसून आलं आहे. केएल राहुलने आशिया चषकात शतकी खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत अर्धशतकी खेळी केली. तर श्रेयस अय्यर यालाही सूर गवसल्याचं दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने 90 चेंडूत 105 धावा केल्या. तसेच वनडे क्रिकेट कारकिर्दितलं तिसरं शतक झळकावलं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर तिसऱ्या स्थानावर उतरला आणि त्याने ही कामगिरी केली.
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरने सांगितलं की, “हा एक रोलरकोस्टर प्रवास होता आणि चांगलं वाटलं. संघातील मित्र आणि माझ्या कुटुंबाची साथ होती. मी दुखापतग्रस्त असताना टीव्ही बघायचो तेव्हा टीम सोबत खेळायची खूप इच्छा असायची. दुखापतीमुळे खूपच त्रास होत होता. पण मला माझं लक्ष्य माहिती होतं. मला आनंद आहे की त्यावर काम केलं आणि त्यात यश मिळवलं.”
“मी फलंदाजीला गेलो तेव्हा मला काही गोष्टी कठीण करायच्या नव्हत्या. मला खेळपट्टीवर टिकून राहायचं होतं आणि मी असाच स्वताला आत्मविश्वास देत असतो. आता माझ्या फलंदाजीचा प्रश्न असेल तर मी संघासाठी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार आहे. संघाला जिथे गरज असेल तिथे मी पूर्ण प्रयत्न करेन.”, असं श्रेयस अय्यर याने सांगितलं.
श्रेयस अय्यर याला नंबर 3 वर फलंदाजी करणार का? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने उत्तर देत सांगितलं की, “विराट कोहली महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडून नंबर तीनचं स्थान हिसकावून घेऊ शकत नाही. मी संघासाठी कोणत्याही स्थानवार फलंदाजीस तयार आहे. मला फक्त धावा करायच्या आहेत.”