Ind vs Aus Test : विराट कोहलीला इरफानकडून कानमंत्र, स्पिनर्सला असं खेळला नाही तर…
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यादरम्यान कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीला माजी खेळाडू आणि 2007 मधील वर्ल्ड कप विजेत्या इरफान पठाणने कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेची क्रीडा वर्तुळातील प्रेक्षकही मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. कसोटी सामन्यांमध्ये टशन आणि थ्रिल पाहायला मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यादरम्यान कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीला माजी खेळाडू आणि 2007 मधील वर्ल्ड कप विजेत्या इरफान पठाणने कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
नेमका काय सल्ला दिलाय? ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉन आणि विराट कोहलीने या मालिकेमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारायला हवा. कारण अॅश्टन आगर आणि नॅथन लियॉन यांच्यासारख्या फिरकपटूंचा सामना करण्यासाठी विराटने आक्रमक पद्धतीने बॅटींग करायला हवी, असा सल्ला इरफाण पठानने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही चांगलं प्रदर्शन करत आहेत. यामधील नॅथन लियॉनचं भारतीय उपखंडातील प्रदर्शन चांगल्या प्रकारचं राहिलं आहे.
विराट कोहलीची बॅटींग पाहिली तर मागील काही सामन्यांमध्ये विराट फिरकीपटूंना खेळताना संघर्ष करताना दिसला आहे. आताच झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या कसोटीमध्ये विराटने चार डावांमध्ये अवघ्या 45 धावा केल्या आहेत. इतकंच नाहीतर या सामन्यांमध्ये विराट कोहली याला स्पिनरनेच आपल्या जाळ्यात अडकवत त्याला बाद केलं होतं.
विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून स्पिनरविरोधात संघर्ष करताना दिसला आहे. त्यामुळे मला वाटतं की विराटने आपल्या बॅटींगमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारायला हवा. महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्ट्राईक रेटही पडला आहे त्यामुळे त्यानेसुद्धा आक्रमक बॅटींग करण्याचा निर्णय असावा, असं इरफान पठाण म्हणाला.
कसोटी क्रिकेटमध्ये तुमच्याकडे संयम असायला हवा. नॅथन लियॉन हा स्पिनर त्याच्या लाईन, लेंथ आणि बाऊन्ससाठी ओळखला जातो, ही गोष्ट लक्षात घेत विराटने थोडं आक्रमक होत बॅटींग करायला हवी, असंही इरफानने म्हटलं आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 104 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामधील 177 डावांमध्ये बॅटींग करताना 8119 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 27 शतके तर 7 अर्धशतके मारली असून 254 हा त्याचा वैयक्तिक सर्वाधिक स्कोर आहे. त्यामुळे विराट कोहली शतक मारणार की कांगारू त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, 2018 नंतर कांगारूंचा संघ भारतात कसोटी मालिकेसाठी येत आहे. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये कोण बाजी मारणार आणि मालिका खिशात घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.