IND vs AUS : न्यूझीलंड विरुद्ध बिकट अवस्था, तरीही BGT साठी रहाणे-पुजाराकडे दुर्लक्ष, बीसीसीआयचं चुकलं?
Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara Border Gavaskar Trophy : बीसीसीआय निवड समितीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंना स्थान दिलेलं नाही.
भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडने टीम इंडियाची 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बिकट अवस्था करुन ठेवली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे टीम इंडियावर मायदेशात 2012 नंतर कसोटी मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. मायदेशात ही परिस्थिती असतानाही बीसीसीआय आणि निवड समितीने यातून काही बोध घेतला नसल्याचंच स्पष्ट झालं आहे. टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यापासून ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. निवड समितीने माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना वगळलं आहे.
भारताचं समीकरण अटीतटीचं
भारताला सलग आणि एकूण वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी 7 पैकी 4 सामने जिंकायचे आहेत. टीम इंडिया त्यापैकी 5 सामने हे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी या मालिकेत खेळणार आहे. तर न्यूझीलंड विरुद्ध 2 सामन्यांचे निकाल लागायचे आहेत. मात्र पहिला सामना गमावल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं समीकरण फार अटीतटीचं झालं आहे. भारताची याआधी गेल्या काही वर्षांमध्ये मायदेशात अशी स्थिती झाली नव्हती. मात्र त्यानंतरही आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निवड समितीने रहाणे आणि पुजारा या अनुभवी जोडीला संधी का दिली नाही? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दोघेही 16 महिन्यांपासून ‘आऊट’
रहाणे आणि पुजारा हे दोघे टीम इंडियातून वर्षभरापेक्षा अधिक काळ दूर आहेत. पुजारा जून 2023 तर रहाणे जुलै 2023 पासून भारतीय संघापासून दूर आहेत. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत या दोघांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. रहाणेनेतर आपल्या नेतृत्वात धमाका केलाय. मात्र त्यानंतरही युवा खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे निवड समितीला अनुभवी फलंदाज संघात नको का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. तसेच वारंवार अपयशी होऊनही संघात अनेकांन संधी मिळतेय? मग रहाणे आणि पुजारा या दोघांनीच काय घोडं मारलंय? असाही प्रश्न एका क्रिकेट रसिकाला पडला नाही तरच आश्चर्य.
हे दोघे टीम इंडियाचे सक्रीय अनुभवी खेळाडूंपैकी आहेत. दोघांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. या दोघांनीच गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतल्यानंतर रहाणेने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिका जिंकून दिली. विराट परतला तेव्हा टीम इंडियाची 4 सामन्यांच्या मालिकेतील स्थितीत 0-1 अशी होती. तर रहाणेने भारताला 2-1 अशा फरकाने विजयी केलं. तर पुजाराचं योगदानही विसरुन चालणार नाही. पुजाराने चिवट बॅटिंग केली. इतकंच नाही, तर बॅटिंगदरम्यान त्याने अंगावर अनेक ठिकाणी फटके सहन केले. दरम्यान आता पुजारा-रहाणेला संधी न देऊ निवड समितीने चूक केली की नाही? हे या मालिकेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक
पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.